पुणे विभागात 35 हजार 504 क्विंटल ‘अन्नधान्या’ची तर 7 हजार 716 क्विंटल भाजीपाल्याची ‘आवक’

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 35 हजार 504 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 716 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1600 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 2 हजार 838 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 22 एप्रिल 2020 रोजी 98.845 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.876 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 76 हजार 967 स्थलांतरित मजुरांची सोय 1 लाख 49 हजार 485 मजुरांना भोजन
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 152 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 777 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 929 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 76 हजार 967 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 49 हजार 485 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.