पाटील प्लाझा बेकायदेशीर स्टॉल्स विरोधी गाळेधारकांची जोरदार निदर्शने व रास्ता रोको

महापौर आणि आयुक्तांनी लक्ष घालावे यासाठी विनंती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मित्रमंडळ चौकाजवळील पाटील प्लाझा समोरील फूटपाथवर पुणे महानगरपालिकेने बेकायदा ठेवलेल्या स्टॉल्स विरोधात पाटील प्लाझातील सुमारे 217 गाळेधारक, मालक व कर्मचारी यांनी पाटील प्लाझा समोर जोरदार निदर्शने व रस्ता रोको केले. तसेच मित्रमंडळ ते शनिवारवाडा हा ‘नो हॉकर्स झोन’ असूनही पाटील प्लाझा समोर बेकायदा स्टॉल्स फूटपाथवर उभे करून तेथील वाहतूकीला व शांततेला बाधा आणण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या कृतीला विरोध म्हणून मित्रमंडळ चौक परिसरातील नागरिकांनी देखील निदर्शनात सहभाग घेतला.

तसेच काल मा. महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व प्रत्यक्ष पाहणीचा आग्रह धरला. त्यावेळी ‘हा स्टॉलचा प्रश्न मला माहीत असून येत्या सोमवारी अथवा मंगळवारी प्रत्यक्ष जागेला मी भेट देईन व त्यातील काही स्टॉल्स तरी तेथून हलवता येतील का याबद्दल अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल’ असे त्या म्हणाल्या. तसेच पाटील प्लाझा गाळेधारकांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन तेथे प्रत्यक्ष भेटीची मागणी केली.

आजच्या निदर्शनात सुमारे 200 हून अधिक गाळे धारक व कर्मचारी तसेच मित्र मंडळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘या ठिकाणी प्रतिकात्मक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून पुणेकरांची गैरसोय आम्ही टाळली व त्यामुळे नागरीकांना मनस्ताप झाला नाही तसेच पोलिसांनी देखील सहकार्य केले प्रतिकात्मक रास्ता रोको बरोबरच शांततामय निदर्शने केली’ असे पाटील प्लाझा गाळे धारकांच्या वतीने अंकुश भोसले आणि रमेश शेट्टी यांनी सांगितले. तसेच पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयाविरूद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे ते म्हणाले.

या निदर्शनात महिला देखील सहभागी झाल्या होत्या. हातात घोषणा फलक व बॅनर घेऊन पुणे महानगरपालिकेच्या निषेध केला जात होता. हे शांततामय आंदोलन बघण्यासाठी देखील परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली व या आंदोलनास पाठिंबा दिला. त्यामध्ये मित्र मंडळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्याने होते.

आरोग्य विषयक वृत्त-
पावसाळ्यात आरोग्याची घ्या अशी काळजी
सावधान ! चायनीज फूड खाताय ? हे लक्षात असू द्या
पचनप्रणाली बिघडल्यास होऊ शकतो यकृतावर परिणाम