31व्या पुणे फेस्टिव्हलचे 6 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा 31 वे वर्ष साजरे करीत आहे. 31व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवार, दि. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल. याप्रसंगी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, खासदार गिरीश बापट, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये नृत्यांगना अभिनेत्री हेमा मालिनी यांचा ‘गंगा’ बॅले, ऑल इंडिया उर्दू मुशायरा, अ.भा. हिंदी हास्य कवी संमेलन, मराठी हास्य कवी संमेलन, महिला महोत्सवात मिस पुणे फेस्टिव्हल, नृत्य, पेंटिंग्स्, पाककला अशा विविध स्पर्धा, केवळ महिलांसाठी लावणी, केरळ महोत्सव, कीर्तन महोत्सव, उगवते तारे व इंद्रधनू, मराठी नाटक, वाद्य वादन, शास्त्रीय नृत्ये, शास्त्रीय गायन, हिंदी मराठी गाण्यांचे कार्यक्रम व विविध क्रीडा स्पर्धाअशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही ज्येष्ठ नृत्यांगना अभिनेत्री व पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन हेमा मालिनी यांचा बॅले हे विशेष
आकर्षण असणार आहे. हेमा मालिनी त्यांचा पहिला नवा बॅले नेहमी पुणे फेस्टिव्हलमध्ये प्रथम सादर करतात. गेल्या 30 वर्षात एकूण 27 वेळा त्यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये बॅले/गणेश वंदना सादर केली आहे. यावर्षी ‘गंगा’ हा त्यांचा बॅले रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी त्या सादर करणार आहेत. पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरीक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते.

पुणे फेस्टिव्हलच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना सोमवार, दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडीयम येथे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्या हस्ते विधीवत संपन्न होईल. याप्रसंगी अभिनेत्री गिरजा प्रभू व अभिनेत्री मानसी मुसळे उपस्थित राहणार आहेत. वेदमुर्ती धनंजय घाटे गुरूजी याचे पौरोहित्य करतील.

विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्तींना उद्घाटन सोहळ्यात ‘जीवनगौरव पुरस्कार’ व ’पुणे
फेस्टिव्हल अ‍ॅवॉर्ड’ देऊन गौरवले जाते. यंदा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते प्रेम
चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे. तसेच ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सुबोध भावे, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी, महिला उद्योजिका श्रीमती उषा काकडे व बॉडी बिल्डर संग्राम चौघुले यांना पुणे फेस्टिव्हल अ‍ॅवॉर्ड देवून गौरवले जाईल.
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून पुणे फेस्टिव्हलतर्फे 2 लाख रूपये मुख्यमंत्री सहाय्यनिधीस दिले जाणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवात शताब्दी साजरी करणार्‍या गणेश मंडळांच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये उद्घाटन सोहळ्यात सत्कार करण्यात येतो. या वर्षी कस्तुरी चौक मित्र मंडळ आणि निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळ या यंदा शताब्दी साजरी करणार्‍या सार्वजनिक गणेश मंडळांचा उद्घाटन सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे.

पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात जेष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने कार्यक्रमास सुरुवात होईल. यानंतर ‘पंचजन्य शंखनाद’ पथकातर्फे 20 युवक युवतींनी सलवार, झब्बा, उपरणे व पुणेरी पगडी अशा पेहेरावात सादर केलेला सामुहिक शंखध्वनी कार्यक्रम सादर होईल. संतोष पोतदार यांनी याचे आयोजन केले आहे. यानंतर नंदिनी गुजर या गणेश स्तुती सादर करतील. कथ्थक नृत्यांगना तेजस्विनी साठे व भरतनाट्यम नृत्यांगना अरुंधती पटवर्धन या 12 सहकलावंतांसमवेत एकत्रित ‘गणेश पंचरत्नं – मुदा करत मोदकं’ या संस्कृत श्लोकावर आधारित कथ्थक व भरतनाट्यम यांचे फ्युजन असणारी गणेश वंदना सादर करणार आहेत. अमोद कुलकर्णी यांनी याचे संगीत संयोजन केले आहे. यानंतर श्री गणेशाची पूजा व आराधना करणार्‍या ‘जय देव जय देव श्री गणराया’, ‘लंबोदर तू विनायका’, ‘सुख करता दुःख हरता’, ‘सांगतो नमन’ आणि ‘हरे राम हरे राम’ महामंत्र यावर आधारित बॉलीवूड गणेश पूजा हा सिद्धी पोतदार आणि अक्षय गुप्ता यांचा ‘सिधाक्ष प्रॉडक्शन’ तर्फे विशेष नृत्याविष्कार सादर होईल. यामध्ये 18 मुले मुली सहकलावंत असून सिद्धी पोतदार यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.

यानंतर गुरु पंडिता मनीषा साठे यांनी संरचना केलेला जपानी डान्सिकल टायको ‘कलासंयुज’ हा कार्यक्रम सादर होईल. टायको हे पारंपारिक जपानी वाद्य 11 भारतीय शिष्या कथ्थक नृत्य प्रणालीसह सादर करणार आहेत. विख्यात बी. के. एस. अय्यंगार इन्स्टिट्युटचे 25 – 30 मुले मुली विद्यार्थी सामुहिक योगासन सादर करणार आहेत. याचे संगीत अमृता गोडसे यांनी केले असून अय्यंगार गुरुजींची नात अभिजाता अय्यंगार आणि शिष्य व योगाशिक्षक राया यांनी याचे संयोजन केले आहे. पुणे फेस्टिव्हलच्या स्थापनेपासून सलग 30 वर्षे पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक म्हणून काम करणारे कृष्णकांत कुदळे यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहणारी फिल्म यावेळी दाखविली जाईल. सुभाष सुर्वे यांनी याची निर्मिती केली आहे. केरळच्या सांस्कृतिक परंपरांवर आधारित ‘आपला केरळ’ हा नृत्यसंगीत कार्यक्रम सादर होणार असून त्यामध्ये 40 स्थानिक मल्याळी मुले-मुली कलावंत पारंपारीक वेषभूषेत कथ्थकली, भरतनाट्यम्, मोहिनीअट्टम, थिरूवाथिरकली, कुचीपूडी अशी नृत्ये सादर करतील. पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर यांनी याचे आयोजन केले आहे.

या उद्घाटन सोहळ्यात शेवटी ‘लावणी आणि घुमर’ यांचे फ्युजन सादर होणार असून त्यामध्ये चित्रतारका तेजा देवकर, संस्कृती बालगुडे, भार्गवी चिरमुले, मानसी मुसळे, गिरीजा प्रभू आणि वैष्णवी पाटील सहभागी होत आहेत. सोबत पुणे फेस्टिव्हलचे 30-40 सहकलावंत देखील सहभागी होत आहेत. पायलवृंदच्या निकिता मोघे यांनी यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

या उद्घाटन सोहळ्याचे मराठीतून सुधीर गाडगीळ आणि इंग्रजीतून दूरिया शिपचांडलर सूत्रसंचालन करतील. या उद्घाटन सोहळ्यानंतर श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रात्री 9:30 वा. ऑल इंडिया उर्दू मुशायरा सादर होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग मंत्री मोहम्मद नसीम आरिफ खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पॉप्युलर मेरठी (मेरठ), मंझर भोपाली (भोपाळ), इक्बाल अश्हार (दिल्ली), रियाज सागर (मुझफ्फरनगर), अफरोज आलम (दुबई), अतुल अजनबी (ग्वालियर), शहीद अदिली (हैदराबाद), शाईस्ता सना (कानपूर), अंजली अदा (काश्मीर), रेहाना शहीन (अलीगड), डॉ. मेहताब आलम (भोपाल), शरफ नांपर्वी (दिल्ली) हे देशातील नामवंत उर्दू शायर सहभागी होत आहेत. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार व डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा आबेदा इनामदार यांनी याचे संयोजन केले आहे.

शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हिंदी हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रख्यात कवी सुभाष काब्रा याचे सूत्रसंचालन करणार असून यामध्ये सैनिकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करणारे राष्ट्रपती पदक विजेते कवी पुण्याचे कर्नल डॉ. वी. पी. सिंह, टीव्ही व रेडियो स्टार कवी मुंबईचे महेश दुबे, 1000 हून अधिक हास्यकवी संमेलनात सहभागी झालेले कवी रतलामचे अशोक सुंदरनी, ‘आलसी’ नावाने देश विदेशात प्रसिद्ध असलेले कवी इटारसीचे राजेंद्र मालवीय आणि गीत गजल मध्ये नावलौकिक मिळवलेली तरुण कवयित्री दिल्लीची पद्मिनी शर्मा यामध्ये सहभागी होत आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व सदस्य मनिष आनंद, सदस्या पूजा आनंद आणि पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी याचे आयोजन केले आहे.

प्रख्यात नृत्यांगना अभिनेत्री व पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन हेमा मालिनी यांचा प्रत्येक नवा बॅले त्या पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर करतात. पुणे फेस्टिव्हलच्या गेल्या 30 वर्षांमध्ये त्यांनी तब्बल 27 वेळा त्यांचा बॅले अथवा गणेश वंदना सादर केली आहे. यंदा रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता हेमा मालिनी त्यांचा ‘गंगा’ हा बॅले सादर करणार आहेत. याचे संगीत पद्मश्री रवींद्र जैन, आशित देसाई आणि आलाप देसाई यांचे असून नृत्य दिग्दर्शन भूषण लखांद्री यांचे आहे. वेशभूषा नीता लुल्ला यांची असून याचे संशोधन राम गोविंद, संवाद व गीते पद्मश्री रवींद्र जैन व शेखर अस्तित्व यांची आहेत. याचे पार्श्वगायन सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, मीका सिंह, रेखा राव, हेमा देसाई आणि आलाप देसाई यांनी केले आहे. या कार्यक्रमांव्यतिरिक्त बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि संकल्प हॉल, नवी पेठ येथे पुणे फेस्टिव्हल अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला महोत्सव, उगवते तारे व इंद्रधनू, कीर्तन महोत्सव व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम असतील.

महिला महोत्सव – दरवर्षी प्रमाणे यंदाही महिला महोत्सवांतर्गत महिलांच्या कलागुणांना वाव देणारे अनेक कार्यक्रम व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
* मिस पुणे फेस्टिव्हल – ही विशेष आकर्षण असणारी स्पर्धा बुधवार 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 ते 7 या वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न होईल. यामध्ये 150 युवती सहभागी झाल्या असून 20 युवतींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे व त्यातून अंतिम 3 विजेत्या निवडण्यात येतील. ग्रुमिंग मेंटर व फॅशन कोरियोग्राफर जुई सुहास असून पुणे फेस्टिव्हलतर्फे सुप्रिया ताम्हाणे यांनी आयोजन केले आहे.

* पाककला स्पर्धा – दरवर्षी प्रमाणे यंदाही महिलांसाठी पाककला स्पर्धांचे आयोजन बुधवार, दि. 4 सप्टेंबर रोजी संकल्प हॉल, नवी पेठ येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. विस्मृतीत गेलेले महाराष्ट्रीयन तिखट पदार्थ घरून करून आणायचे असून प्रत्यक्ष जागेवर गोड पदार्थ करायचा आहे. यामध्ये 250 हून अधिक महिलांनी सहभाग घेतलेला असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. यावेळी काही प्रात्यक्षिके देखील दाखविली जातील. ज्येष्ठ सिनेतारका आशा काळे याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून त्या स्वतः काही प्रात्यक्षिके देखील दाखवणार आहेत. पुणे फेस्टिव्हल करता अंजली वागळे, रचना पाटील, किशोर सरपोतदार आणि शेफ सर्वेश जाधव यांनी पूना गेस्ट हाउस, ऑस्टिन 40 कॅफे आणि इट आउट ऐट टपरी यांच्याकरता याचे संयोजन केले आहे.

* मंगळागौरीचे खेळ – पाककला स्पर्धांनंतर तिथेच दुपारी 4 ते 5 या वेळेत महिलांसाठी मंगळागौरीचे खेळ दाखवले जातील.

* महिलांसाठी नृत्य स्पर्धा – दरवर्षी प्रमाणे यंदाही महिलांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 ते 6 या वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. यामध्ये 20 ते 35 वर्षे आणि 36 ते 50 वर्षे अशा वयोगटात सोलो डान्स स्पर्धा आणि वय 20 ते 50 वर्षे या वयोगटात ग्रुप डान्स स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे. या तिन्ही वयोगटात प्रत्येकी पहिल्या तीन क्रमाकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुणे फेस्टिव्हल करता संयोगिता कुदळे व दिपाली पांढरे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

* महिलांसाठी लावणी – केवळ महिला प्रेक्षकांसाठी मंगळवार, दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे लावणी कार्यक्रम आयोजित केला आहे. शिवरत्न प्रॉडक्शन प्रस्तुत व बालाजी निर्मित योगेश देशमुख यांचा ‘तुमच्यासाठी काय पण’ हा लावणीचा कार्यक्रम असून ‘मी मराठी’ वाहिनीवर लावणी रियॅलिटी शो मधील हा विजेता ग्रुप असून त्यांनी अकलूज लावणी महोत्सवामध्ये सतत 13 वर्षे पारितोषिक मिळवले आहे. पुणे फेस्टिव्हल करता संयोगिता कुदळे व दिपाली पांढरे यांनी याचे आयोजन केले आहे.

* महिलांसाठी पेंटिंग स्पर्धा – निवेदिता प्रतिष्ठान अंतर्गत असणार्‍या महिलांच्या ‘आकृती’ ग्रुप तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही महिलांसाठी पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 101 महिला कलावंतांनी सहभाग घेतला असून त्यांची एकूण 130 पेंटिंग प्रदर्शित केली जातील. दि. 7, 8 व 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 8.30 यावेळेत बालगंधर्व कलादालन येथे हे पेंटिंग प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. याचे उद्घाटन शनिवार, दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. विविध गटात परीक्षकांच्या निर्णयानुसार बक्षिसे दिली जातील, तसेच प्रात्यक्षिके दाखविली जातील. पुणे फेस्टिवल करता अनुराधा भारती यांनी याचे आयोजन केले आहे.

* केरळ महोत्सव – पुणे शहर व जिल्ह्यातील केरळवासियांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही केरळ महोत्सव साजरा होणार आहे. रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सायं 5 ते रात्री 12.30 या वेळेत हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. यामध्ये स्थानिक मल्ल्याळी कलावंत मुले-मुली भरतनाट्यम्, कथ्थकली, मोहिनीअट्टम, मार्गमकली, वल्लमकली आदी नृत्याविष्कार पारंपारीक वेशभूषेत सादर करतील. यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मियांचा एकोपा दाखविणारे नृत्याविष्कार प्रेक्षकांना विशेष आनंद देतील. पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर यांनी याचे आयोजन केले आहे.

* उगवते तारे व इंद्रधनू – उगवत्या व नवोदित कलाकारांसाठी पुणे फेस्टीव्हलमध्ये दरवर्षी ‘उगवते तारे व इंद्रधनू’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वय 7 ते 14 वर्षे मधील बाल कलाकारांसाठी उगवते तारे व 15 ते 25 वर्षे वयोगटासाठी इंद्रधनू कार्यक्रमाचे आयोजन होते. यंदा ‘उगवते तारे’ मध्ये सुमारे 300 व इंद्रधनूमध्ये 100 हून अधिक कलावंत सहभागी झाले आहेत. इंद्रधनू कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवार, दि. 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार असून उगवते तारे भाग 1 बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवार, दि. 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत संपन्न होईल. उगवते तारे भाग 2 व 3 दि. 10 व 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 ते 3.30 या वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न होतील. पुणे फेस्टिव्हल करीता रवींद्र दुर्वे यांनी याचे संयोजन केले आहे.

बालगंधर्व रंगमंदिर मधील अन्य कार्यक्रम –
* मंगळवार, दि. 3 सप्टेंबर सायं. 5 ते 6.30 या वेळेत अमोली थत्ते आणि सहकारी यांचे कथ्थक नृत्य होणार
असून सायं. 6.30 ते 8 या वेळेत शशिकला रवी आणि सहकारी रामायण बॅले सादर करतील.

* बुधवार, दि. 4 सप्टेंबर रोजी सायं. 5 ते 8 या वेळेत कीर्तन महोत्सव सादर होणार असून ह.भ.प. निवेदिता
मेहेंदळे यांनी याचे संयोजन केले आहे.

* शनिवार, दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता महाराष्ट्रातील नामवंत कवी कवयित्रींचा सहभाग असणारे
सदाबहार मराठी कवी संमेलन संपन्न होईल. ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे हे याचे सूत्रसंचालन करणार असून अरूण म्हात्रे (मुंबई), महेश केळुसकर (मुंबई), नितीन देशमुख (अमरावती), सुरेश शिंदे (मंगळवेढा), भरत लोणकर (निमगाव म्हाळुंगे), तुकाराम धांडे (इगतपूरी), नारायण पूरी (नांदेड), रमजान मुल्ला (सांगली), कौस्तुभ आठले (रत्नागिरी), बंडा जोशी (पुणे), अनिल दीक्षित (पुणे), अशोक थोरात (पुणे), मृणाल कानेटकर (पुणे) व अंजली कुलकर्णी (पुणे) हे कवी सहभागी होत आहेत.

* सोमवार, दि. 9 सप्टेंबर रोजी सायं. 5 ते 8 या वेळेत वसंतराव कानेटकर लिखीत ‘सुर्याची पिल्ले’ हे तुफान विनोदी नाटक दाखविले जाणार असून याचे दिग्दर्शन अविनाश ओगले यांचे आहे. यामध्ये अविनाश ओगले, लीना गोगटे, श्रीकांत भिडे व अन्य मान्यवर कलाकार आहेत.

* मंगळवार, दि. 10 सप्टेंबर रोजी सायं. 5 ते 8 या वेळेत हसायदान फौंडेशन प्रस्तुत ‘हास्योत्सव एकपात्रींचा’ कार्यक्रम सादर होईल. याचे संयोजन मकरंद टिल्लू यांनी केले आहे. यामध्ये मकरंद टिल्लू, दिलीप हल्याड, विश्वास पटवर्धन व अन्य कलावंत सहभागी होत आहेत.

* बुधवार, दि. 11 सप्टेंबर रोजी सायं. 5 ते 6.30 या वेळेत शास्त्रीय उपशास्त्रीय गायन पंडित उपेंद्र भट सादर करतील. सायं. 6.30 ते 8 या वेळेत ‘सुरेल संवाद’ ही व्हायोलीन व संतूर जुगलबंदी जया जोग व नीलिमा राडकर सादर करतील.

* बुधवार, दि. 11 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वा. बॉलीवूड हंगामा हा जुन्या व नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादर होणार असून यामध्ये अमोल पारवे, प्रणाली काळे आणि कल्याणी देशपांडे हे गायक सहभागी होणार आहेत. याची संकल्पना व निवेदन स्वप्नील रास्ते यांचे आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथील अन्य कार्यक्रम –

* रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सायं. 7 वा. ‘आशाताई – तुम जिओ हजारो साल’ हा ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा
भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सर्व धर्म समभावातून गणेशोत्सव’ या थीमवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. ज्येष्ठ सिनेतारका आशा काळे याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्राध्यापक रवींद्र शाळू, आरती आठले, मनीषा लताड, कल्याणी देशपांडे, गीतांजली जेढे, स्नेहल आपटे भिडे, केतकी देशपांडे, रेवती सुपेकर, भाग्यश्री डुंबरे भामरे, राधिका अत्रे, क्रिशा चिटणीस आणि मृणाल रणधीर या 11 मराठी गायिका आणि प्राजक्ता मांडके, शिल्पा देशपांडे, डॉ. मानसी अराकडी आणि विद्या नितीन या चार निवेदिका यामध्ये सहभागी होत आहेत. नेवे यांच्या ‘नृत्यपूजा’ संस्थेतर्फे विद्यार्थीनी भरतनाट्यमच्या माध्यमातून आशाताईंच्या काही लोकप्रिय गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत. याची संकल्पना किशोर सरपोतदार यांची असून वेदमुर्ती मोरेश्वर घैसास गुरूजी, पुण्याचे बिशप फ्रान्सिस दीब्रेटो आणि सम्मुदिन तांबोेळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘स्वच्छंद‘ प्रस्तुत या कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाउस तर्फे करण्यात आले आहे.

* सोमवार, दि. 9 सप्टेंबर रोजी सायं. 5 ते 8 या वेळेत ‘शतक संध्या’ या शास्त्रीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे, भारतरत्न पंडित रवीशंकर, ज्येष्ठ गायक संगीतकार हेमंत कुमार, अभिनेते प्राण, सितारादेवी, बुलोसी राणी, गायक मन्ना डे आणि भारत भूषण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ऑडीओ व्हिज्युअल शोचे आयोजन करण्यात आले आहे. बियाँड एंटरटेनमेंटच्या वतीने चित्रपट समिक्षक सुलभा तेरणीकर, वंदना कुलकर्णी आणि उस्मान शेख यांनी याचे संयोजन केले आहे. सूत्रसंचालन अनघा कोर्‍हाळकर करणार आहेत.

* मंगळवार, दि. 10 सप्टेंबर सायं. 5 ते 8 या वेळेत निवेदिता प्रतिष्ठानतर्फे ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ या
भव्य सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 31 ऑगस्ट रोजी व्हि.पी. हाईटस्, नर्‍हे येथे व दि. 1 सप्टेंबर रोजी आझम कॅम्पस येथे या स्पर्धेच्या प्राथमिक फेर्‍या पार पडतील. पुरुष व महिला गटात विविध बक्षिसे दिली जाणार असून पुणे फेस्टिव्हल करता अनुराधा भारती यांनी याचे आयोजन केले आहे.

* बुधवार, दि. 11 सप्टेंबर रोजी सायं. 5 ते 8 या वेळेत ‘मंगेशकर मास्टेरियो – मा. दीनानाथ मंगेशकरांची
पंचरत्ने’ हा कार्यक्रम डॉ. देविका दामले, डॉ. मोहिका दामले आणि चैतन्य कुलकर्णी सादर करणार असून याची निर्मिती, संकल्पना, संहिता आणि निवेदन डॉ. गौरी दामले यांचे आहे.

* पुणे फेस्टिव्हल मधील क्रीडा स्पर्धा –
दरवर्षी प्रमाणे यंदाही पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे फेस्टिव्हलचे प्रसन्ना गोखले या सर्व क्रीडा स्पर्धांचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

* शनिवार, दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता ‘पुणे गोल्फ कोर्स’ येरवडा येथे ‘पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट’ संपन्न होईल. यामध्ये 100 हून अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. हँडीकॅप प्रकारामध्ये 18 होल्स अशा या स्पर्धेचे आयोजन होईल. दुपारी या स्पर्धेचा निकाल लागून बक्षिस वितरण समारंभ पार पडेल. पुणे फेस्टिव्हल करता जयदीप पटवर्धन यांनी याचे संयोजन केले आहे.

* शनिवार, दि. 7 सप्टेंबर आणि रविवार दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पुणे फेस्टिव्हल अंतर्गत
महाराष्ट्र मंडळ, टिळक रोड येथे मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टेट मल्लखांब
असोसिएशनने याचे आयोजन केले आहे. पुरलेल्या खांबावरील मल्लखांब स्पर्धा संपन्न होणार असून 8 ते 15 वर्ष वयोगटातील 250 मुलं व मुलींनी यात सहभाग घेतला आहे. याचा बक्षिस वितरण समारंभ रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता महाराष्ट्र मंडळ येथे संपन्न होईल. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष धनंजय दामले, महाराष्ट्र स्टेट मल्लखांब असोसिएशनचे सचिव अभिजित भोसले आणि महाराष्ट्र मंडळाचे फिजिकल डायरेक्टर सचिन परदेशी यांनी याचे आयोजन केले आहे.

* शनिवार, दि. 7 सप्टेंबर रोजी सायं. 5 वाजता जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ‘क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे बॉक्सिंग ट्रेनिंग सेंटर’मध्ये जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 15 वर्षावरील 60 मुले व मुली सहभागी झाले आहेत. पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सरचिटणीस वाणी सर, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश बागवे याचे संयोजक आहेत.

* रविवार, दि. 8 सप्टेंबर सकाळी 10 वाजता मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, कात्रज येथे कुस्ती स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले आहे. पुणे फेस्टिव्हल करता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी याचे संयोजन केले आहे.

* रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता महेश विद्यालय, कोथरूड येथे पुणे फेस्टिव्हल अंतर्गत
जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजू दाभाडे यांनी याचे आयोजन केले आहे. यामध्ये 15 वर्षाखालील मुलींचे 12-13 संघ व मुलांचे 12-13 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सायं. 4 वाजता संपन्न होईल.

* रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता गोळीबार मैदान येथे पुणे फेस्टिवल ‘डर्ट ट्रॅक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विविध 13 गट आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वळणांचा 1 किमी लांबीचा स्पर्धात्मक ट्रॅक असून 100 हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे. त्यामध्ये पुण्याबरोबरच सांगली, कोल्हापूर, मुंबई, बंगलोर येथील खेळाडूही सहभागी झाले आहेत. याचा बक्षिस वितरण समारंभ सायं. 5 वाजता होईल. या स्पर्धेचे आयोजन ए.आर.एम.एस. ने केले असून फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाची या स्पर्धेस मान्यता आहे. कमलेश दवे आणि विक्रांत राउत यांनी याचे संयोजन केले आहे.

* नृत्यांगना अभिनेत्री हेमा मालिनी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन असून सुरेश कलमाडी हे अध्यक्ष आहेत.
पुणे फेस्टिव्हलचे प्रायोजक जमनालाल बजाज फाउंडेशन, कोहिनूर ग्रुप, भारत फोर्ज लि., अ‍ॅड्विक प्रा.
लिमिटेड, एनईसीसी, पंचशील रियल्टी, रोहन ग्रुप, कायनेटिक ग्रुप, लुंकड रियल्टी, कुमार बिल्डर्स केयूएल, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, बँक ऑफ महाराष्ट्र, डी.वाय. पाटील कॉलेज प्रतिष्ठान, आहूरा बिल्डर्स, प्राइड ग्रुप ऑफ कंपनीज, सुमा शिल्प लि., केएआरई, कुमार प्रॉपर्टीज ग्रुप, देसाई ब्रदर्स लि., प्रवीण मसाले, विश्वेश्वर सहकारी बँक लि., मोहार ग्रुप, बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट, अबिल ग्रुप, जयराज डेव्हलपर्स, बेहरे राठी ग्रुप, येस बँक, हिरानंदानी कम्युनिटीज, हॅलिडिन ग्लास, मंत्री हाउसिंग व कंस्ट्रक्शन लि., श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड, एमआयटी कॉलेज, पाषाणकर ऑटो प्रा. लि., नाईकनवरे ग्रुप, मगरपट्टा टाउनशिप, न्याती ग्रुप, संचेती हॉस्पिटल, कस्तुरी हाऊसिंग प्रा. लि., संजय घोडावत ग्रुप, माउंट वर्ट होम्स्, पिनॅकल ग्रुप हे आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like