क्रिडा समितीचे अध्यक्ष विजय शेवाळे यांच्या हॉस्टेलचा नळजोड बेकायदा

पाणी पुरवठा विभागाची नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या क्रिडा समितीचे अध्यक्ष विजय शेवाळे यांच्या नवी पेठेतील हॉस्टेलसाठी घेतलेले नळ कनेक्शन हे बेकायदा असून ते खंडीत का करू नये? अशी नोटीस स्वारगेट पाणी पुरवठा विभागाने शेवाळे यांना बजावली आहे.

विजय शेवाळे यांची ३४३/३४४ नवी पेठ येथे इमारत आहे. या इमारतीचा वापर हॉस्टेल आणि व्यापारी कारणांसाठी होत आहे. या इमारतीला भोगवटा पत्र नसताना नळ कनेक्शन दिल्याबद्दल स्थानीक नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीवरून स्वारगेट पाणी पुरवठा विभागाने शेवाळे यांना इमारतीची कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार शेवाळे यांनी कागदपत्र सादरही केली होती.

परंतू या मिळकतीचा वापर हॉस्टेल अथवा हॉटेलसाठी करण्यात येत असताना महापालिकेच्या धोरणानुसार त्याच कारणासाठीचे मंजूर नकाशे तसेच भोगवटा पत्र सादर करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात शेवाळे यांनी या इमारतीचे निवासी व व्यापारी वापराचे नकाशे सादर केलेले आहेत. विशेष असे की शेवाळे यांनी कागदपत्र सादर करतानाही या ठिकाणी हॉस्टेल व हॉटेलचे शॉप अ‍ॅक्ट लायसन्सही सादर केलेले आहे. याप्रकरणी पाणी पुरवठा विभागाने विधी विभागाचा अभिप्रायही घेतला. विधी विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार शेवाळे यांनी महापालिका कायद्याचे उल्लंघन केल्याचा अभिप्राय दिला आहे. त्यानुसार स्वारगेट पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी शेवाळे यांना १५ दिवसांत सदर मिळकतीचे नळ कनेक्शन खंडीत करावे, तसे न केल्यास महापालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस २६ डिसेंबरला बजावली आहे.

यासंदर्भात नगरसेवक विजय शेवाळे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, की यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. या इमारतीत विद्यार्थीनी पेईंग गेस्ट म्हणून राहतात. पाणी ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने सद्सद्विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/