पुणे मनपामध्ये ‘रणकंदण’ ! 6 ठिकाणी मताधिक्य घटलं, वडगाव शेरी आणि हडपसरमध्ये ‘पराभव’ फक्त ‘या’ कारणामुळे, सत्ताधाऱ्यांनी सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घटल्याचे आणि दोन जागांवर पराभव झाल्याचे खापर सत्ताधाऱ्यांनी आज अधिकाऱ्यांवर फोडले. अधिकारी काम करत नसल्याने मतदारांची नाराजी भोवली, यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच स्थायी समिती अध्यक्षांसह भाजपच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना दिला.

विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक होती. स्थायी समितीचे अध्यक्ष आणि निर्वाचित आमदार सुनिल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी एक वाजता ही बैठक सुरू झाली. हंगामी आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल यांच्यासह जवळपास सर्वच विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठक सुरू होताच सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी तुम्ही कामे करत नसल्याचा परिणाम पक्षाला निवडणुकीत भोगावा लागला. गेल्यावेळच्या तुलनेत दोन जागा कमी झाल्या तर उर्वरित सहाही मतदार संघात मताधिक्य घटले. यापुढे कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. नियोजित कालावधीतच सांगितलेले काम झाले नाही तर आमच्याशी गाठ आहे, असा इशाराच अधिकाऱ्यांना दिला. प्रामुख्याने पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्ते, या विभागावरून सदस्य अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काहींनी तर भामा आसखेड प्रकल्प, चोवीस तास पाणी पुरवठा या योजनांना विलंब होत आल्याकडे ही लक्ष वेधले.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवक, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन विधानसभा मतदार संघातील पराभव आणि सहा मतदार संघात घटलेल्या मताधिक्यावर आक्षेप घेत, कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे. एवढेच नाहीतर याची कारनिमिमांस करण्याचे आदेश ही पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरून यापुढील दिशा स्पष्ट केल्याचे दिसत आहे.

Visit : Policenama.com