पुणे मनपा : ‘राडारोडा-माती’ उचलण्याच्या कामांत घनकचरा विभागाकडून ‘गैरव्यवहार’

घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांची चौकशी व बदली करण्यात यावी, मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांची मागणी

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – महापालिका आयुक्तांनी वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकांतील आदेश पायदळी तुडवून राडारोडा उचलणे, लँन्डडींलींगसाठी माती वाहून नेण्यासारख्या कामामध्ये महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांनी गैरव्यवहार केला आहे. स्वत;च्या कुटुंबातील व्यक्तिंनी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी घनकचरा विभागाकडील ठेकेदारांनाच प्रायोजक म्हणून घेतले जात असल्याने गैरव्यवहाराची पुष्टी मिळत आहे या गैरव्यवहारांची चौकशी करून संबधित अधिकार्‍यांची बदली करावी, अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

वसंत मोरे म्हणाले, देवाची उरूळी व फुरसुंगी डेपो येथील कचरा डेपोमध्ये लॅन्डडीलींग करण्यासाठी राडारोडा टाकण्याचे काम घनकचरा विभागाने एका कंपनीला दिले आहे. परंतू प्रत्यक्षात त्याठिकाणी व्हेईकल डेपोने ज्या कंपनीच्या गाड्या भाडेतत्वावर घेतल्या आहेत, त्याच कंपनीच्या वाहनांतून लॅन्डडीलींगच्या ठिकाणी अगदी अडीच कि.मी. अंतरावरील शेतातून माती टाकण्यात येत आहे. घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक आणि उपअभियंता सुधीर चव्हाण या दोघांनी महापालिका आयुक्तांनी राडारोडा वाहतुकीसंदर्भात वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकांना हरताळ फासून ठेकेदारांचे हित जोपासले आहे. विशेष असे घनकचरा विभागाचे प्रमुख सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांच्या चिरंजीवाच्या शिवस्मृती प्रतिष्ठानच्यावतीने काही महिन्यांपुर्वी बालगंधर्व रंगमंदिर येथे घेण्यात आलेल्या बळीराजा या कार्यक्रमास कचरा प्रक्रिया प्रकल्प व अन्य कामे घेतलेल्या ठेकेदारांकडून प्रायोजकत्व घेण्यात आले होते. यातून घनकचरा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांची मिलिभगत स्पष्ट होत असून सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक आणि उपअभियंता सुधीर चव्हाण या दोघांची चौकशी करून अन्य विभागात बदली करावी.

यासंदर्भात सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांच्याकडे चौकशी केली असता, ते म्हणाले की घनकचरा विभागाने देवाची उरूळी येथील कचरा डेपोतील लँन्डडीलींगसाठी काढलेल्या निविदेनुसारच २५ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आणि वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. पावसाळा लांबल्याने माती टाकण्याचे काम उशिरा सुरू झाले आहे. बांधकामापासून निर्माण होणार्‍या राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा वाघोली येथील प्रकल्प कार्यन्वीत झाल्यानंतर देवाची उरूळी कचरा डेपोवर राडारोडा टाकणे बंद करण्यात आले आहे. जुन्या कचर्‍याच्या ढिगार्‍यांवर माती टाकून कॅपिंग करण्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नसून कुठल्याही चौकशीस तयार आहे. बळीराजा या सार्वजनिक उपक्रमासाठी प्रायोजकत्व देण्यासाठी कुठल्याही ठेकेदारावर बळजबरी करण्यात आली नाही. एका प्रकल्प चालकांने सामाजिक आणि शेतकर्‍यांशी संबधित विषय असल्याने स्वत:हून या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याचे स्पष्टीकरण मोळक यांनी केले आहे.