नगरसेवक, प्रशासनाने साथ दिल्यास अपेक्षित उत्पन्नाचा आकडा नक्कीच गाठेन : स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने

आजी - माजी सभागृहनेत्यांचा विरोधकांवर पलटवार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या मागील दहा अंदाजपत्रकांचा अभ्यास केला. प्रत्येकवेळी आयुक्त आणि स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये तूटच आढळून आली आहे. पुण्यातील राजकिय संस्कृतीतील सौदार्हाचे वातावरण पाहाता, सभागृहातील प्रत्येक नगरसेवक, अधिकारी आणि पुण्यातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा अनुभव आणि सहकार्य मिळाले तर ७,३९० कोटी रुपयांचे उत्पन्न शक्य आहे, असे आत्मविश्‍वासपूर्वक आवाहन स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सभागृहात केले. यानंतर सलग तीन दिवस २८ तासांच्या चर्चेनंतर महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये २०२०-२१ या वर्षीचे अंदाजपत्रक मंजुर करण्यात आले.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी २०२०-२१ यावर्षीसाठी सादर केलेल्या ७,३९० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकावरील चर्चेला आज तिसर्‍या दिवशी सकाळी सुरूवात झाली. यावेळी विरोधकांकडून अंदाजपत्रकात स्वप्नरंजन केल्याचे आरोप करतानाच मागील काही वर्षांचे व आताचे उत्पन्नाचे आकडे सादर करण्यात आले. तसेच स्थायी समिती अध्यक्षांनी सुचविलेल्या योजना व उत्पन्नाच्या स्त्रोतांची चिरङ्गाड करताना उपाययोजनाही सुचविताना राजकिय चिमटेही काढण्यात आले. याला आज तिसर्‍या दिवशी भाजपच्या पदाधिकार्‍यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले तर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी विकास कामांत सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सभागृह नेते धीरज घाटे म्हणाले, हे अंदाजपत्रक सर्वसमावेशक आहे. महसुलवाढीचा संकल्प केला आहे. मध्य पुण्यात लहान बसेस मधून प्रवास अभिनंदनीय आहे. बालकांच्या हृदयरोग तपासणीची योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. अंदाजपत्रकात चुकून काही ङ्गोटो मागे पुढे झाले. यावर राजकारण करण्याचे कारण नाही. प्रशांत जगताप यांनी तर सभागृहात अंदाजपत्रकावर बोलण्याऐवजी नगरसेवकांवरच बोलले. काही जणांनी तर दारुड्याने व्यसनमुक्ती वर भाषण द्यावे तसे आरोप भ्रष्टाचारी नेत्यांची परंपरा असलेल्या पक्षाच्या नगरसेवकांनी करावी, अशी टीका माजी महापौर दीपक मानकर यांनी केलेल्या आरोपांवर केली. एकजण कोणी चुकला असेल तर त्याला नक्कीच बोला, पण अगोदर चांगले वागा मग दुसर्‍याला चांगले वागायचा सल्ला द्या, असा टोला प्रशांत जगताप यांना लगावला.
विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ म्हणाल्या, योजनांचे स्वागत आहे, मात्र उत्पन्न कसे होणार हे दिसत नाही. केवळ स्वप्नरंज आहे. मागील योजनांसाठीचा योजना वापरला गेला नाही. यामध्ये प्रशासनाचे अपयश दिसून येते. स्मार्ट व्हीलेज हे स्मार्ट सिटीप्रमाणे गोंडस नाव देण्यात आले आहे. समाविष्ट गावांवर निधी वाटपात पुन्हा एकदा अन्याय करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले, मुळात आयुक्तच वास्तुस्थिला अनुसरून अंदाजपत्रक तयार करत नाहीत. आयुक्तांच्या अंदाजपत्रकातच मोठी तूट येते. डेव्हलपमेंट चार्जेस मध्ये बांधकाम व्यावसायिकांना तीन टप्प्याची सवलत देतो पण एखादया फ्लॅट धारकाचा पाच हजार टॅक्स थकला की त्याला दरमहा दोन टक्के दंड लावतो, हे कसे चालेल. जर बांधकाम व्यावसायिकांना सूट देतोय तर मिळकत करावरील शस्तिकर माफ करा. रातोरात परस्पर रस्ते खोदाई केले जातात. मग खोदाई ची रक्कम कोठून जमणार. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिलायन्स जिओ कंपनीला ३०० किमी चे रस्ते खोदाई साठी परवानगी देताना त्यांच्याकडून फी घेऊ नये असे आदेश दिलेत. रिलायन्स जिओ आपले जावई आहेत ?

शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले, घनकचरा विभागावर ५०० कोटी रुपये खर्च करतो. पण एक तरी नगरसेवक स्वचतेबाबात समाधानी आहेत का, हे पहा. कचरा किती निर्माण होतो, याचे ऑडिट केले जात नाही. एचसिएमटीआर मुळे १९८७ च्या आराखड्यात आहे. परंतु आताची लोकसंख्या पाहता आणि त्यामार्गावरील आताची बांधकामे पाहिली तर अनेक घरांवर हातोडा पडणार आहे. तेंव्हा हा प्रकल्प करताना सद्यस्थिती प्रमाणे बदल करावा. जायका , एचसिएमटीआर, समान पाणी पुरवठा या योजनांच्या निवादांमुळे महापालिका बदनाम झाली आहे. छोट्या – छोट्या निर्णयातून कोट्यवधी रुपयांची बचत होईल, तरच पालिकेचे उत्पन्न वाढेल.

मनसेचे गटनेते वसंत मोरे म्हणाले, फाजील आत्मविश्वासातून उत्पन्नाचे आकडे फुगविले आहेत. २०० उन्नत पादचारी मार्ग पादचार्‍यांसाठी करणार की जाहिरातिसाठी. यापूर्वीचा अनुभव घेता, असे पादचारी पुल सुरक्षिततेच्या दृष्टीने नक्कीच योग्य नाहीत. होंर्डिंग चा निकाल आपल्या बाजूने लागला तर ८० कोटी रुपये उत्पन्न वाढणार, या जरतर वर उत्पन्न दाखविले तर कसे होणार. कात्रज कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर काम तर सुरूच झाले नाही, पण ६६ लोक अपघातात दगावलेत. असे फोटो अंदाजपत्रकात प्रकल्प म्हणून दाखवले आहेत. मुख्य उत्पन्नाचे स्रोत असलेल्या बांधकाम आणि मिळकतकर विभागाकडे मनुष्यबळ पुरेसे नसताना आपण उत्पन्न कसे वाढणार, या शब्दात ओरखडे ओढले.

रिपाइंच्या गटनेत्या सुनीता वाडेकर यांनी ऐतिहासिक भिडे वाड्याचे महत्व लक्षात घेऊन त्याचे तातडीने विकसन करावे अशी मागणी केली. तसेच पुष्पक शव वाहिनीसाठी तरतूद करून उपनगरातील नागरिकांना दिलासा दिलाय, असे यावेळी नमूद केले. श्रीनाथ भिमाले यांनी तीन वर्षांच्या सत्ताकाळात नवीन कचरा प्रकल्प उभारले. उड्डाण पुलाची कामे सुरू आहेत. उत्पन्नासाठी चांगले पर्याय ठेवले आहेत. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी एमआयएमच्या गटनेत्या अश्‍विनी लांडगे, नगरसेवक ऍड. गङ्गूर पठाण यांचीही भाषणे झाली.

एखाद्या निधीचे १० -१० लाख रुपयांच्या कामांसाठी लॉकींग केले जाते. नगरसेवकांना असे का करावे लागते याचे कारण प्रशासनाने कधी विचारले आहे? प्रशासनाने नगरसेवकांच्या स्थानीक पातळीवरील गरजा लक्षात घ्याव्यात. निम्न स्तरावरील अधिकार्‍यांची कार्यपद्धती लक्षात घ्यावी. प्रशासनाला प्रत्येक कामाची चौकशी करण्याचे अधिकार असताना का चौकशी केली जात नाही? केवळ एखाद दुसर्‍या नगरसेवकांने चुकीचे काम केले असेल तर सर्वांना दोषी धरण्याच्या पद्धतीमुळे नगरसेवक बदनाम होत आहेत. याला कारणीभूत अधिकारी आहेतच, परंतू पालिकेत महत्वाचे पद भुषविलेले नगरसेवकही प्रशासनाच्या चूका दाखविण्याऐवजी ‘मी’ पणा दाखवून नगरसेवकांवरच टीका करत असतील, तर योग्य नाही या शब्दात अरविंद शिंदे यांनी माजी महापौर प्रशांत जगताप यांना टोला लगावला. विशेष असे की आघाडीतीलच नगरसेवकाने ही टीका केल्यानंतर सत्ताधार्‍यांनी केवळ बाके वाजवून त्याचे स्वागत केले. मात्र, सत्ताधारी भाजपच्या एकाही नगरसेवकाने यावर बोलणे मात्र प्रकर्षाने टाळले.

अंदाजपत्रकावरील तीन दिवस चर्चा होण्याची मागील काही वर्षातील ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे काल संध्याकाळी सर्व गटनेत्यांनी एकत्र येत शेवटच्या दिवशी प्रत्येक पक्षाचे किती नगरसेवक भाषण करणार हे निश्‍चित केले होते. दरम्यान, दोन दिवस भाषणाची संधी न मिळाल्याने प्रभागातील कार्यक्रमानिमित्त सभागृहातून निघून गेलेले माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि कॉंग्रेसचे नगरसेवक यांनी आज भाषणाची संधी मिळाली, यासाठी सभागृहात आवाज उठविला. परंतू महापौरांनी पक्षनेत्यांनी ठरविल्यानुसारच कामकाज होणार हे स्पष्टपणे सांगितल्याने महापौर मुरलीधर मोहोळ आणि नगरसेवक अविनाश बागवे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अखेर वरिष्ठ सहकार्‍यांनी हस्तक्षेप केल्यानंतर प्रकरण शांत झाले.