बदलीनंतरही PI ‘पदभार’ सोडेनात, कर्मचार्‍यांची पोलिस निरीक्षकाविरूध्द ‘तक्रार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यांचे निरीक्षक ‘बेजार’ झाले असताना वाहतूक विभागात मात्र, ड्युटी सुखकर अन् सगळ काही आलबेल असल्यासारखेच एक पोलीस निरीक्षक बदलीनंतरही तिथेच ठाण मांडून असल्याचे पहायला मिळत आहे. बदलीनंतरही ते चार्ज सोडयाला तयार नाहीत. त्यातच एका कर्मचार्‍याने या पोलीस निरीक्षकाविरोधात उद्धट वर्तन केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलात चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला असून, वरिष्ठांची मेहरबानी की त्यांचे आदेश पाळले जात नाहीत, अशीही चर्चा केली जात आहे.

पोलीस निरीक्षक राजेश पुराणीक यांनी बदली झाल्यानंतरही येथील चार्ज सोडत नसल्याचे दिसत आहे. वाहतूक शाखेकडून काढण्यात येणार्‍या ड्युटी चार्टमध्ये भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचा चार्ज हा एका उपनिरीक्षकांकडे देण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. तर, येथील पोलीस निरीक्षक पुराणीक यांना अतिरीक्त कार्यभार समुदेशन येथे देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, पुराणीक येथील चार्ज सोडायला तयार नसल्याचे दिसत आहे.

शहरातील काही भागातील वाहतूकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच आवर्जुन उल्लेख करावा तो कात्रज परिसराचा. वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भारती विद्यापीठ वाहतूक विभागात सध्या वेगळेच चित्र पाहिला मिळत आहे. येथील वाहतूक कोंडी सोडविण्या ऐवजी पोलीस निरीक्षक अन कर्मचारी यांच्यात बेबनाव झाला आहे.

कर्मचार्‍याची पोलीसांकडे धाव…
पुराणीक आणि या विभागात कार्यरत असणार्‍या एका सहाय्यक फौजदाराचे शाब्दिक चकमक उडाली होती. पुराणीक यांनी उद्धट वर्तन केल्याप्रकरणी या फौजदारांने थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. भारती विद्यापीठ पोलीसांनी ही खात्याअंतर्गत बाब असल्याचे सांगत तो तक्रार अर्ज वाहतूक विभागाला दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनला उत्तर दिले नाही. त्यामुळे वाहतूक विभागात नेमके काय चालले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आदेश नाहीत…
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आपण भारतीलाच कार्यरत असल्याचे ते सांगत असल्याचे कर्मचारी सांगतात. त्यामुळे ते येथील चार्ज सोडत नसल्याचे बोलले जात आहे. त्यांना असा आदेश नसल्याचेही ते सांगतात असेही बोलले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/