स्थानिक व वाहतूक पोलीसांमधील ‘समन्वया’साठी मोठे बदल, उपायुक्तांची अंतर्गत बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील वाहतूक कोंडीवर जालीम उपाय काढण्यासाठी आता पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून, उपायुक्तांच्या बदलीसोबतच शहर वाहतूक विभागाला प्रथमच ‘प्रमुख पर्यवेशक’ म्हणून अप्पर पोलीस आयुक्त मिळाले आहेत. तत्पुर्वी अचानक झालेल्या बदलांमुळे मात्र, पोलीस दलात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. पुणे पोलीसांचा वाहतूक विभाग यावर उपापयोजना करत आहेच. पण, वाहतूक कोंडी मात्र काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलीसांकडून उपाययोजनांसोबतच दंडात्मक कारवाईवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. बेशिस्तांना शिस्त लावण्यासोबतच नेमकी वाहतूक कोंडी का होत आहे, याची पाहणीकरून ते बदल करण्यासाठी महापालिकेला कळविल्या जात आहेत.

पुण्याच्या वाढलेला आवाका आणि वाढती वाहन संख्या लक्षात घेता वाहतूक शाखेचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे कामाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या संकल्पनेतून आता वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस समन्वयातून त्यांच्या विभागातील प्रमुख पाच समस्यांची माहिती गोळा करणार आहेत. अशा 30 परिमंडळातून 150 समस्या काढण्यात आल्या आहेत. तसेच, त्यातील आवश्यक असे उपाय शोधले जात आहेत. त्यामुळेच सर्व कामकाजात सुसुत्रता व्हावी व वाहतूक शाखेचे उपायुक्त आणि परिमंडळाचे उपायुक्त यांच्यातील समन्वय रहावा, यासाठी हे फेरबदल करण्यात आल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यात वाहतूक शाखेचे विद्यमान पोलीस उपायुक्त या पदाची सर्व कर्तव्ये आणि जबाबदार्‍या वाहतूक शाखेचे प्रमुख म्हणून अप्पर आयुक्त करतील असे म्हटले आहे.
यापुढे पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे हे वाहतूक शाखेचे प्रमुख पर्यवेक्षक व नियंत्रक अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. त्यामुळे प्रथमच अप्पर पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी वाहतूक विभागाला मिळाला आहे.

वाहतूक दंडाचा आकडा गुलदस्त्यात
पुणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना हेल्मेट परिधान करण्याच्या बाजूने आहेत. त्यासाठी त्यांनी पुणेकरांना आवाहन केलेच पण, दंडात्मक कारवाईचा जोरही वाढविला. त्यानंतर रस्त्यांवर उतरून आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक विभाग हेल्मेट परिधान न करणार्‍या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. मात्र, गेल्या एक वर्षाच्या या दंडात्मक कारवाईचा आकडा गुलदस्त्यात आहे. त्याची माहिती बाहेर येऊ दिली जात नाही. तशा सूचनाच वाहतूक विभागाला देण्यात आल्या आहेत. तरीही या अकरा महिन्यात पुणेकरांना केवळ हेल्मेट कारवाईतून काही कोट्यांवधी रुपये या दंड केला आहे.

वाहतूक शाखेच्या उपायुक्त पदी प्रसाद अक्कानवरू
 – पकंज देशमुख यांची परिमंडळ चारच्या उपायुक्तपदी नियुक्ती 
पुणे पोलीस दलातील दोन पोलीस उपायुक्तांच्या मंगळवारी सायंकाळी अतंर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी बदल्यांचे आदेश दिले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पकंज देशमुख यांची परिमंडळ चारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू यांची वाहतूक शाखेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/