पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : पोलिस जीवाची बाजी लावून आपल्यासाठी कोरोना विरुद्ध चे युद्ध लढत आहेत – अश्यात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्यच आहे. याच भावनेतून पर्फेक्ट पेस्ट कंट्रोलचे गोपी नायर आणि क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या वतीने आज संपूर्ण पोलिस आयुक्त कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
हवेत ,रस्त्यावर किंवा इमारतींवर सोडियम हायपोक्लोराईट ची फवारणी किंवा निर्जंतुकीकरण टनेल हे मानवी शरीराला घातक असल्याने त्यांचा वापर थांबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला आदेश काढावे लागले. मात्र ज्या ठिकाणी नागरिकांचा वावर आहे अश्या ठिकाणी प्रभावी निर्जंतुकीकरण कसे करता येइल याबाबत पर्फेक्ट पेस्ट कंट्रोल चे संचालक गोपी नायर आणि क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर प्रयत्नशील होते.यावेळी प्रभावी जंतुनाशक म्हणून प्रमाणित असलेल्या व्हायरेक्स २५६ ह्या जंतुनाशकाचे अल्प प्रमाणात पाण्यात मिसळून तयार केलेले द्रव्य उत्तम जंतुनाशकाचे कार्य करते आणि याद्वारे ८/१० दिवस तो परिसर बऱ्यापैकी निर्जंतुक राहू शकतो असे प्रमाणित असल्याचे गोपी नायर यांनी निदर्शनास आणून दिले.
यानंतर क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी काही तज्ञांशी संपर्क साधला व त्यांनी ही अश्या पद्धतीने निर्जंतुकीकरण करणे योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यानुसार आज पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासह बंडगार्डन पोलिस स्टेशन / कोरेगांव पार्क पोलिस स्टेशन येथे निर्जंतुकीकरण करण्यात आले.अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे ,पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे,साहाय्यक पोलिस आयुक्त आस्थापना मिलिंद पाटील व ए सी पी एडमिन मालोजीराव पाटील यांच्या सहकार्याने हे काम पार पडले. काल अलंकार पोलिस स्टेशन येथून या निर्जंतुकीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली व पोलिस उपायुक्त कार्यालयासह सर्व पोलिस स्टेशन निर्जंतुक करण्यात आले.
सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून सदर निर्जंतुकीकरण मोफत करण्यात येत असून अन्य ठिकाणी ही ते करण्यात येइल असे गोपी नायर व संदीप खर्डेकर म्हणाले.निशांत पोडुवाल आणि जुगलकिशोर यांच्या टीमने हे कर्तव्य पार पाडले.पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यासह अलंकार पो.स्टे. च्या पोलिस निरीक्षक कल्पना जाधव, कोथरूडच्या पो नि प्रतिभा जोशी, वारजे पो नि अशोक कदम साहेब, उत्तमनगर पो नि सुनिल पंधरकर , सिंहगड पो नि शेळके , दत्तवाडी पो नि घेवारे यांचे उत्तम सहकार्य लाभले.