पुण्यात कुंटणखान्याच्या मालकीनीशी सुत जुळवून हवालदाराची पोलिस खात्याशी ‘बेईमानी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फरासखाना पोलीस ठाण्यात नेमणूक असताना पोलीस हवालदाराचे कुंटणखान्याच्या मालकीनीशी अनैतिक संबंध ठेवले आणि तिच्या नावे फ्लॅट घेऊन त्याचा वापर वेश्या व्यवसायासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हवालदाराला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांना बडतर्फीचे आदेश दिले आहेत. हनुमंत महादेव वणवे असे बडतर्फ करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे.

फरासखाना पोलिस ठाण्यातंर्गत गाडीतळ पोलिस चौकीत हनुमंत 2017 पासून कार्यरत होते.

त्यावेळी २०१९ मध्ये पोलिसांनी येथे छापा टाकला. त्यात एका मुलीची सुटका केली. त्या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. याप्रकरणी कुंटणखाना मालकीन सोनिया बागोल आणि गणेश भोसले यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी सोनियाच्या मोबाईलची तपासणी केली. त्यात हनुमंत व कुंटनखाना मालकीन सोनिया यांचे एकत्रित फोटो मिळाले. सोनिया हिच्या मोबाईलचा सिडीआर काढण्यात आला. त्यात अनेकवेळा दोघांचे फोनद्वारे बोलणे झाले असल्याचे समोर आले. त्यातून या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच हनुमंतने बुधवार पेठेतील भगत इमारतीतील तिसऱ्यया मजल्यावरील ९९३ क्रमांकाचे घर एप्रिल २०१९ मध्ये खरेदी करुन सोनिया आणि गणेशच्या नावावर केले. त्याठिकाणी जून २०१७ ते ऑक्टोबर २०१८ कालावधीत सोनियाने मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केले.

सोनिया आणि हनुमंत यांचे संबंध असल्यामुळे पोलिस कारवाईची माहिती तिला पुरविली जात होती. त्यामुळे पोलिस कारवाईस अडथळा निर्माण झाला.

हनुमंतचे वर्तन संशयास्पद आणि गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याने त्याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले असल्याचे आदेशात म्हटले आहे.