सिटी ‘कंट्रोल’ रूममध्ये फावल्या वेळात गप्पा मारणार्‍या ‘त्या’ 9 महिला कर्मचार्‍यांसह 11 जणांना ‘सक्त ताकीद’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात काम सोडून ‘गप्पा’ मारणार्‍या त्या 10 महिला कर्मचार्‍यांना वरिष्ठांनी सक्त ताकीदीची शिक्षा देऊन ही पहिलीच वेळ असल्याने सुधारण्याची संधी दिली आहे. मात्र, याप्रकरणामुळे ज्वलंत प्रश्नाला वाचा फुटली असून, पोलीस आयुक्तालय अन् पोलीस दलात काम सोडून कानात हेडफोन घालत गाणे ऐकणार्‍या आणि मोबाईल चाळणार्‍यांबाबतही वरिष्ठांनी लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. 9 महिला कर्मचार्‍यांसह 11 जणांचा यामध्ये समावेश आहे.

पोलीस आयुक्तालयात असणार्‍या पुणे पोलीसांच्या पोलीस नियंत्रण (100 क्रमांक) कक्षात तीन शिफ्टमध्ये काम चालते. येथे महिला आणि पुरूष कर्मचारी असतात. एकावेळी जवळपास 30 ते 35 जण याठिकाणी काम करतात. एखादी घटना घडली किंवा अडचण आली, तसेच कोणाला काही पोलिसांना कळवायचे असेल तर शंभर क्रमांकावर फोन केला जातो. त्यानंतर येथील कर्मचारी संबंधित माहिती त्या-त्या पोलीस ठाण्याला देतात आणि तात्काळ त्याठिकाणी पोलीस पोहचतात.

मात्र, डिसेंबर महिन्यात (दि. 9) हे सर्व कर्मचारी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कर्तव्यास होते. यादरम्यान, ते आपआपसात बोलत होते. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नियंत्रण कक्षाच्या पोलीस निरीक्षकांनी त्यांना सूचना दिल्या. पण, या सूचनांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. तसेच, या कालावधीत त्यांचे फोन बंद (कॉल लॉग आऊट) ठेवण्याचे प्रमाण देखील जास्त वेळ असल्याचे दिसून आले. याबाबत स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली. तसेच, संबंधित कर्मचार्‍यांना याचा खुलासा विचारण्यात आला. त्यावेळी मात्र तो संयुक्तीक असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे सर्वांना वर्तनात सुधारणा करण्याची संधी देत मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्रा यांनी सर्वांना सक्त ताकीद ही शिक्षा दिली आहे.

दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तालय तसेच मुख्यालय आणि पोलीस ठाण्यांमध्येही अनेक वेळा कर्मचारी कर्तव्यावर असताना फोनवर खेळत किंवा गाणे ऐकत बसलेले असतात. सर्रास हा प्रकार पाहायला मिळतो. तासनतास फोनवर गप्पा मारत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे याकडेही वरिष्ठांनी लक्ष घालून संबंधितावर कारवाई करण्याची गरज आहे. त्यातून मुळ कामाचा वेग वाढेल.