पुणे पोलीसांची ही प्रणाली राज्यभर सुरू करण्यासाठी सरकारला शिफारस : स्वाधिन क्षत्रिय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीसांनी सुरू केलेली ‘सेवा प्रणाली’ ही नागरिकांसाठी फायदेशीर ठरत असून, या प्रणालीमुळे नागरिकांना केंद्र बिंदू ठेवून पोलीस काम करत आहेत. ही प्रणाली राज्यभर राबवावी, अशी शिफारस राज्य सरकारकडे करणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी केली.

पोलीस आयुक्तालयात या सेवा प्रणाली कार्यालयाचे उद्घाटन क्षत्रिय यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, स्वप्ना गोरे, शिरीष सरदेशपांडे, प्रसाद अक्कानुरु, सुहास बावचे, मितेश घट्टे, वीरेंद्र मिश्र यांच्यासह पोलीस निरीक्षक व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सेवा प्रणाली उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना कसा अनुभव आला त्याबद्दल नागरिक व तक्रारदार विठ्ठल थोरात आणि अनिल साधू यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

सेवा उपक्रमामुळे लोकाभिमुख प्रशासन पाहायला मिळत आहे. कोणत्याही कामात पारदर्शकता महत्वाची असून सेवा प्रणालीमुळे उद्देश सफल झाला असे सांगू क्षत्रिय म्हणाले, राज्यभरातील विविध शासकीय विभागामध्ये सेवा प्रणाली उपक्रमाची माहिती देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच हा उपक्रम राज्यव्यापी करण्यासाठी लोकसेवा हक्क आयोगाच्यावतीने शासनाला शिफारस करण्यात येणार आहे. या प्रणालीचा नागरिकांना फायदा होत आहे. यामुळे मोबाईल अ‍ॅपवरही उपक्रमाची सेवा देता येईल का याविषयी क्षत्रिय यांनी पोलिसांना सूचना केली आहे.

सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, सेवा प्रणाली उपक्रमामुळे शहरातील नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. लोकांच्या प्रतिसादानंतर प्रणालीद्वारे आणखी बदल घडविण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहे. नागरिकांच्या सूचनानुसार पोलिस त्या कामाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पोलीसांवरील जबाबदारी वाढली आहे.

बांधकामामुळे गैरसोय…
पोलीस आयुक्तालयातील इमारतीत नवनवीन बदल होत असताना मंगळवारी आयुक्तालयात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सुरू आलेल्या ‘सेवा’कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांची गैरसोय झाली. कार्यक्रम सुरू असताना पोलीस आयुक्तालयातील तिसऱ्या मजल्यावरील सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर फरशा बसविणे, भिंत उभारणी तसेच अन्य कामे सुरू होती. बांधकामाचा पडलेला राडारोड्यातून वाट काढत नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.

Visit : Policenama.com