मॅट कोर्टाचा पुणे पोलिसांना दणका

 ग्रॅच्युईटी मधून कापून घेतलेली रक्कम सेवनिवृत्त उपनिरीक्षकांना देण्याचे आदेश

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – उपनिरीक्षकांना पदोन्नतीच्या वेळी दिलेले अधिकचे वेतन सेवनिवृत्तीच्या वेळी कापून घेणाऱ्या पुणे पोलिसांना मॅट कोर्टाने दणका दिला आहे. ‘त्या’ उपनिरीक्षकांची कपात केलेली तातडीने परत द्यावी, असा आदेश कोर्टाने दिला आहे. दीपक देसाई आणि वामन गोडसे अशी त्या सेवानिवृत्त उपनिरीक्षकांची नावे आहेत. हे दोघेही पुणे पोलीस दलात शिपाई पदावर भरती होऊन खात्याअंतर्गत परीक्षा देऊन उपनिरीक्षक झाले होते.

तीन वर्षांपूर्वी दोघेही याच पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्ती नंतर देसाई यांच्या ग्राच्युईटी मधून 45 हजार 598 रुपये कपात करण्यात आले होते. 1996 ते 2016 या काळात पदोन्नतीच्या वेळी देण्यात आलेल्या अधिकच्या वेतनाच्या बदल्यात ही रक्कम कपात करण्यात आल्याचे कारण देण्यात आले. तर राष्ट्रपतीपदक मिळालेले वामन गोडसे यांना चांगल्या कामगिरीबाबत दोन वेळा वेतन वाढ तसेच पदोन्नतीच्या वेळी वेतनवाढ देण्यात आली होती. त्यांच्याही ग्रॅच्युईटी मधून 1 लाख 6 हजार 817 रुपये कापून घेण्यात आले होते.

या दोघांनी ऍड. व्हि. व्हि. जोशी यांच्या मार्फत मॅट कोर्टात दाद मागितली होती. न्यायाधीश ए. पी. कुऱ्हेकर यांनी यावर निकाल देताना या दोन्ही अपिलकर्त्यांची कपात केलेली रक्कम निकालानंतर दोन महिन्यात परत देण्याचे आदेश दिले आहेत. या मुदतीत रक्कम परत न दिल्यास या रकमेवर 9 टक्के लाभांश देण्याचे आदेश दिले आहेत.