‘आती तेथे माती’ ‘या’ म्हणीचा पुणे पोलिसांना मिळाला ‘धडा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शहरातील अपघातांची संख्या कमी करायची असेल तर एकमेव उपचार म्हणजे सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरले पाहिजे. त्यासाठी त्यांच्यावर सक्ती करा, असे आदेश निघाले. वाहतूक पोलीस तर काय अशा आदेशाची वाटच पहात असतात. त्यांनी या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत दररोज हजारो दुचाकीस्वारांना वेठीस धरण्यास सुरुवात केली.

एकाच वेळी चार ते पाच वाहतूक पोलीस घोळक्याने चौकाच्या कडेला उभे राहत. वेगाने वाहणाऱ्या रस्त्यामध्ये जात, प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वाराला बकोटी पकडत असल्याचे दृश्य शहरात चौकाचौकात दिसू लागले. हेल्मेटसक्तीच्या नावाखाली कोट्यावधींचा दंड वसुल करण्यात आला. गेल्या पाच महिन्यात पुणेकरांवर तब्बल ४० ते ४५ कोटी रुपयांची दंड आकारणी वाहतूक शाखेने केली आहे. त्याचवेळी ही दंड वसुली करण्यासाठी त्यांनी आणखी एक मोहिम राबवून त्याद्वारे पुन्हा रस्त्यावर अडवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यातून हजारो दुचाकीचालकांना भर रस्त्यात अपमानीत करण्याचे प्रकारही घडले. काही ठिकाणी कोणी विरोधी आवाज केला तर त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी तातडीने सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करुन थेट अटक करविली.

त्याचबरोबर त्यांची हप्तेखोरीही जोरात सुरु होती. गेल्या पाच महिन्यात अशी हप्तेखोरी करणाऱ्या वाहतूक शाखेच्या काही पोलिसांना निलंबित करण्याची खुद्द त्यांच्या उपायुक्तांवर वेळ आली आहे. पुणे शहर पोलीस दलातील कारवाई झालेल्या पोलिसांची संख्या पाहता गेल्या पाच महिन्यात सर्वाधिक वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यापासून ताकीद देण्यापर्यंतची शिक्षा देण्यात आली आहे.

रस्त्यावर वाहतूक पोलिसांचा हा धुडगुस सुरु असताना वरिष्ठ मात्र आपल्याच कोषात मग्न होते. हेल्मेटसक्तीचा आणि प्राणघातक अपघात कमी होण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्राणघातक अपघात कमी झाले, ही आकडेवारी कुरवाळत वाहतूक पोलिसांच्या रस्त्यावरील आरेरावीकडे दुर्लक्ष करत राहिले. हेल्मेट घालूनही गेल्या ५ महिन्यात किमान ५ जणांना रस्त्यावरील अपघातात मृत्यु झाला याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत राहिले.

हेल्मेटसक्तीबाबत जे अनुकुल होते व अपघातापासून वाचायचे असेल तर स्वत:च्या सुरक्षेकडे स्वत:च लक्ष दिले पाहिजे, अशी भूमिका असणारे नागरिकही वाहतूक पोलिसांचा हा जाच पाहून हबकुन गेले. त्याचेच प्रत्यंतर आमदारांसह अनेकांनी या सक्तीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. लोकमताची दखल घेणे मुख्यमंत्र्यांना भागच पडले. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या रस्त्यावरील आरेरावीला चाप लावण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ऑगस्टमध्ये पुण्यात आल्यानंतर अनेक चांगली कामे हाती घेऊन शहरातील गुन्हेगारीवर लगाम घालण्याचा प्रयत्न केला. अगदी काँस्टेबलपासून सह आयुक्तांपर्यंत सर्वांना कामाला लावले. पोलिसांना कामाला लावण्याबरोबरच त्यांच्या कल्याणासाठी पुढाकार घेऊन अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली.

शहरातील प्राणघातक अपघात कमी करायचे तर केवळ हेल्मेटसक्ती करुन उपयोग नाही. त्याबरोबर अनेक गोष्टी आहेत. याचा विसर पडून हेल्मेटसक्तीसाठी वाहतूक पोलिसांना मोकळीक दिली. त्यामुळे त्यांनी रस्त्यांवर जो काही धिंगाणा घातला. त्याचा अंकुश लावावा लागला. म्हणतात ना ‘अति तेथे माती’ मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पुणे पोलिसांना या म्हणीचा धडा मिळाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

मोबाईल आणि कंप्युटरचा जास्त वापर करणाऱ्यांनी अशी घ्यावी “डोळ्याची” काळजी 

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय 

जाणून घ्या. कुष्ठरोगा बाबतचे समज-गैरसमज 

 “ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय 

Loading...
You might also like