विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ६७ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक सुरळीत, सुरक्षित चालणे करिता वाहतूक शाखेकडून वारंवार वेगवेगळ्या कलमांखाली विशेष मोहिमांचे आयोजन केले जाते.

पुणे शहरात अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दिलेल्या सूचनांवरून पोलीस उपआयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे दिनांक 6 जून 2019 रोजी रहदारीत हयगीने, बेदरकारपणे व वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या एकूण 67 वाहनचालकावर कलम 279 भा.द.वी प्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याप्रमाणे वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने वाहने चालवणारे वाहनचालकाविरुद्ध विशेष मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. नागरिकांना याद्वारे असे आव्हान करण्यात येत आहे की वाहन चालविताना हयगयीने व बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे अपघात होत असून त्याप्रमाणे वाहने चालवू नयेत.

सदरच्या गुन्ह्याबाबत 6 महिने पर्यंतचा कारावास व 1 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. तसेच वाहतुकीच्या समस्या बाबत पुणे शहर वाहतूक शाखेच्या ट्विटर अकाउंट, व्हाट्सअप मोबाईल क्रमांक 8411800100 व सतर्क पुणेकर ॲप, वाहतूक विभागाचे ट्रॅफिक क्लब, व्हाट्सअप ग्रुपवर तक्रार किंवा सूचना कराव्यात व वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.