पुरंदरच्या पंचायत समितीला मिळेना ‘वाली’ !

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – गटविकास अधिकाऱ्यांनी गोमूत्र शिंपडून कार्यालय स्वच्छ करण्याचे प्रकरण ताजे असतानाच पुरंदर पंचायत समितीच्या ढिसाळ कारभाराने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गटविकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त असून सहायक गटविकास अधिकारी यांची कामात सुरू असलेली दिरंगाई, वारंवार रजेवर जाणारे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात रस दाखविण्यापेक्षा मनमानी कारभार करण्याने पंचायत समितीच्या कारभाराबाबत लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कारभार हातात घेताच आठवडी बाजाराच्या दिवशी किंवा आठवड्यातील मंगळवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देण्याच्या सूचना केल्या होत्या. शासनाने नागरिकांच्या प्रश्नाचे समाधान व्हावे यासाठी लोकशाही दिनाची अंमलबजावणी तालुकास्तरावर तिसऱ्या सोमवारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुरंदर पंचायत समितीच्या कारभारावर कोणाचेही नियंत्रण नसून मनमानी कारभार चालला आहे. त्यामुळे पंचायत समितीला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत खुद्द माजी सभापतींनी सहायक गटविकास अधिकाऱ्यांच्या कारभारावर ताशेरे ओढत सभात्याग केला होता. मात्र, याचा काहीही फरक येथील अधिकाऱ्यांना पडलेला दिसत नाही.

तालुक्यात जवळपास १०० गावे असून स्थानिक तक्रारी, घरकुल, दिवाबत्ती, गटार यंत्रणा यांसारखे शेकडो प्रश्न घेऊन नागरिक सासवडला येतात. सहसा आठवडी बाजाराच्या निमित्ताने अधिकारी उपस्थित असतील व आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल या आशेपोटी नागरिक दर आठवड्याला खेटा मारतात. मात्र, आज साहेब नाहीत, लिपिक नाही, विस्तार अधिकारी रजेवर आहेत, हा आमच्या विभागाचा प्रश्न नाही, साहेब मिटिंगला आहेत…पुन्हा या अशी उत्तरे देत सर्वसामान्य नागरिकांना बाहेरचा मार्ग दाखविला जातो. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर संजय जगताप यांनी प्राधान्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांना दिल्या होत्या. मात्र, शासन आदेशाला कचऱ्याची टोपली दाखविणारे अधिकारी जगताप यांच्याही सूचना पाळत नसल्याचे चित्र आहे.

पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवालावर रिपोर्ट बनवले जात नाहीत, मनमानी कारभार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे, वरिष्ठ कार्यालयांच्या व अधिकाऱ्यांच्या सुचनेचे व आदेशांचे पालन केले जात नाही, कर्मचाऱ्यांना आठवडी बाजाराच्या दिवशी व इतर वेळी सारख्या रजा दिल्या जातात व त्या मंजूर केल्या जात आहेत त्यामुळे कर्मचारी नियमाप्रमाणे वागत नसतानाही त्यांची पाठराखण करण्याचे काम मोरे करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

दरम्यान, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग यांवर गटविकास अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने कारवाई करण्याची मागणी होत असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवले जावेत आणि याविषयी आमदार संजय जगताप यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

“मी आत्तापर्यंत चार तक्रार अर्ज पंचायत समितीकडे केले. त्यावर विस्तार अधिकारी एस.जे.कुंभार यांनी चौकशी अहवाल बनवून ते गटविकास अधिकाऱ्यांना सादर केले. हे अहवाल मिळविण्यासाठी मी चारवेळा पंचायत समितीच्या चकरा मारल्या. परंतु दरवेळी कर्मचारी हजर नसल्याचे कारण देत मला अहवाल मिळाले नाहीत. विशेष म्हणजे अहवालात दोषींवर सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मोरे यांना एका प्रकरणाची चौकशी २४ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देऊनही त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच सूचनांना जिथे पायदळी तुडवले जात असेल तिथे सर्वसामान्य नागरिकांचे किती हाल होत असतील ?” – (अक्षय निगडे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष, पुरंदर तालुका)