‘ती’ खुन्नस काढण्यासाठी विखेंकडून राष्ट्रवादीला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे प्रयत्न !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत नगरची जागा काँग्रेसला न सोडल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांना भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवावी लागली. खूप प्रयत्न करूनही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डाळ शिजू न दिल्याचा राग डोक्यात ठेवूनच गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुरुंग लावण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातून पक्षाला हद्दपार करण्यासाठी एकही आमदार निवडून येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आम्हाला भाजपचा रस्ता विखे यांनीच दाखविल्याची जाहीर कबुलीही राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी दिली आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व आमदार राहुल जगताप यांना राष्ट्रवादी सोडण्यास प्रवृत्त करण्याची विखे यांची रणनीती सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेची जागा जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी खूप प्रयत्न केले. तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जोरदार प्रयत्न केले. परंतु ते प्रयत्न असफल ठरले. पवार हे कोणत्याही परिस्थितीत जागा सोडण्यास तयार झाले नाहीत. अखेर लोकसभा निवडणुकीसाठी विखे यांना भाजपात प्रवेश करावा लागला.

विखे यांच्या प्रवेशानंतर विद्यमान खासदार असूनही दिलीप गांधी यांचा पत्ता कट करून राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाने सुजय विखे यांच्या गळ्यात लोकसभेची उमेदवारीची माळ घातली. विखे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. एखाद्याने केलेल्या राजकीय कुरघोडीचा बदला घेणार नाहीत ते विखे कसले? विखे घराण्याच्या परंपरेनुसार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा न सोडल्याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व आमदारांना पक्षाबाहेर जाण्यास प्रवृत्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यात पहिला प्रयत्न आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या भाजप प्रवेशातून दाखवून दिला आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा मार्ग विखे यांनी दाखविल्याचे पिचड यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनाही राष्ट्रवादीत राहून तुमचे काही खरे नाही. विधानसभा निवडणूक जड जाईल, अशा पद्धतीची विनवणी विखे यांच्याकडून सुरू आहे. खासदार सुजय विखे यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप यांची नुकतीच एक बैठकही झाल्याची चर्चा आहे. शहराची जागा शिवसेनेकडे असल्यामुळे आ. संग्राम जगताप यांचे शिवसेनेत जाण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु शिवसेनेकडून त्यांना तीव्र विरोध आहे. युती जर झाली नाही, तर भाजपाकडून लढायचे, अशीही आमदार संग्राम जगताप यांची इच्छा आहे. आमदार राहुल जगताप हेही राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ काढून भाजपात जाण्याच्या प्रयत्नात आहेत.

भाजपात प्रवेश केलेले आ. वैभव पिचड, आ. संग्राम जगताप व आ. राहुल जगताप यांचे मुंबईतील एकत्रित फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. लोकसभेची जागा न सोडल्यामुळे विखे यांनी त्याचा राग. काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात सुरुंग लावून हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –