पुत्रापायी विखे – पाटलांची विरोधी पक्षनेते पदावर पाणी सोडण्याची नामुष्की

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या खासदारकीच्या स्वप्नापायी राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडण्याची नामुष्की ओढवली आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीन वर्षापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या सुजय विखे यांनी हट्ट न सोडल्यामुळे त्यांचे वडील राधाकृष्ण विख यांना राज्यातील महत्त्वाचे घटनात्मक पद सोडण्याची वेळ आली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्ष नेते हे महत्त्वाचे पद काँग्रेस श्रेष्ठींनी बहाल केले होते. त्यामुळे विखे यांचा पक्षातील प्रभाव आणखीनच वाढला गेला. विरोधी पक्षनेतेपदासारखे महत्त्वाचे पद असतानाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा त्यांना राष्ट्रवादीकडून मिळवता येऊ शकली नाही. जागा काँग्रेसला मिळत नसल्याने नेमके काय करावे, असा प्रश्न राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमोर होता. दुसरीकडे गेल्या तीन वर्षापासून खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या पुत्र सुजय यांनी निवडणुकीचा हट्ट कायम ठेवला. ते निवडणूक करण्यावर ठाम राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षााचे अध्यक्ष शरद पवार हे काही केल्या जागा सोडायला तयार झाले नाही. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा लागला. मुलगा भाजपात गेल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासारख मोठे पद असूनही राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी गोची झाली. त्यांनी सुरुवातीला काँग्रेससोबत असल्याची भूमिका जाहीर केली. काँग्रेसनेही त्यांचा स्टार प्रचारकांच्या यादी समावेश केला. मात्र, पक्षाच्या प्रचारात सक्रिय दिसून आले नाही. त्यांनी भाजप उमेदवार असलेल्या पुत्राचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे काँग्रेसकडूनही त्यांना डावलले जाऊ लागले. परिणामी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडून भाजपात प्रवेश करण्याचा ठरविले आहे, असे सांगितले जात आहे.

पुत्राच्या हट्टापायी राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेते पदासारखे महत्त्वाचे घटनात्मक पद सोडावे लागणार आहे. पोराचे खासदारकीचे स्वप्न त्यांना चांगलेच महागात पडले, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.