‘फ्लेक्स फाडले म्हणून खासदारकी जाणार नाही’ ; राधाकृष्ण विखे-पाटीलांचा ‘त्यांना’ टोला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार डॉ. सुजय विखे यांचे फ्लेक्स फाडले म्हणून त्यांची खासदारकी जाणार नाही. समाजात काही समाजकंटक असतात. त्यांना दुसऱ्याचा विजय पचत नाही, असा टोला ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले की, सुजय विखे पाटील हे खासदार झाले म्हणून त्यांच्या अभिनंदनाचे लावलेले फ्लेक्‍स संगमनेरमधील काही लोकांनी फाडून टाकले. समाजात काही समाजकंटक असतात. त्यांना दुस-यांचा विजय मानवत नाही. पण आता तालुक्यातीलच जनता त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही.

सरसकट कर्जमाफी द्या

राज्यात दुष्काळाची तीव्रता व पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सरकारने त्या पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतक-यांना उत्पन्नाचे इतर कुठलेच स्त्रोत नसल्याने सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य शेतक-यांची आहे. या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

बंद पडलेले वरिष्ठ महाविद्यालय पुन्हा सुरू करणार

संगमनेर येथील वरिष्ठ महाविद्यालय बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. ते विद्यालय पुन्हा सुरू व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. त्यामुळे ते कशा पद्धतीने सुरू करण्यात येईल. त्यासाठी मी लक्ष घालणार आहे, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.