राधाकृष्ण विखे – पाटील आणि अनिल शर्मा यांचे ‘सेमसेम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या एक महिन्यांपासून दक्षिण नगरमधील उमेदवारीवरुन महाराष्ट्रात मोठे घमासान माजले होते. काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसने वेळेत निर्णय न घेतल्याने शेवटी डॉ. सुजय विखे हे भाजपच्या आश्रयाला गेले आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची मोठी अडचणी झाली आहे.

महाराष्ट्रात जे राजकारण भाजपने खेळत काँग्रेसला अडचणीत आणले तशीच खेळी काँग्रेसने हिमाचल प्रदेशात खेळली आहे. त्यांनी भाजपचे ऊर्जामंत्री अनिल शर्मा यांचा सुपुत्र आश्रय शर्मा याला मंडी मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी दिली आहे.
सुखराम यांचे पुत्र असलेले अनिल शर्मा हे मंडी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. सध्या ते भाजपच्या सरकारमध्ये ऊर्जामंत्रीही आहेत. आपला मुलगाच विरोधी पक्षात गेल्याने त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता.

नगरमध्ये जशी राधाकृष्ण विखे यांनी आपण नगरमध्ये प्रचाराला जाणार नाही, असे सांगितले. तसेच आश्रय यांची उमेदवारीची घोषणा होताच अनिल शर्मा यांनी ते आश्रयच्या विरोधात प्रचार करणार नाहीत, असे जाहीर केले आहे. आता नगरमध्ये ज्या प्रमाणे राधाकृष्ण आपल्या पुत्राच्या विजयासाठी पडद्याआडून धडपड करत आहेत, तशीच धडपड अनिल शर्मा करणार का हे पहावे लागणार आहे. भाजपने मंडी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रामस्वरुप शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.