प्रत्येक गरीबाच्या खात्यात दरवर्षी ७२ हजार जमा करणार : राहूल गांधींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाच वर्षात भारतीय जनतेने मोठ्या संकटांचा सामना केला आहे. त्यामुळे येत्या ५ वर्षात आमचं सरकार आल्यास न्यूनतम आय योजना सुरु करणार आहोत. २० टक्के आर्थिकदृष्ट्या कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार आहोत. देशातील २५ कोटी लोकांना किमान उत्पन्नाची हमी देणार आहोत. अशी घोषणा राहूल गांधी यांनी आज केली आहे. लोकसभा निव़डणूकीच्या तोंडावर राहूल गांधी यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

२१ व्या शतकात भारतात गरीब असावेत हे कॉंग्रेसला मान्य नाही. गरीब आणि श्रीमंत असा दोन भागात वाटला गेलेला भारत आम्हाला मान्य नाही. ही स्कीम नाही तर गरीबीचा शेवट आहे. या देशात मागील ५ वर्षात नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. १२ हजार पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांना आम्ही मदत करणार आहोत. २० टक्के भारतीयांना याचा लाभ होणार आहे. ५ कोटी कुटुंबातील २५ कोटी जणांना याचा लाभ होईल. दरवर्षी या कुटुंबांच्या खात्यात ७२ हजार रुपये जमा होतील. नरेंद्र मोदी श्रीमंतांना पैसे देऊ शकतात तर आम्ही गरीबांना पैसे देऊन या देशातून गरीबी हटविणार आहोत. असे ते म्हणाले.