मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही ! कर्जमाफीवरून राजू शेट्टी सरकारविरोधात ‘आक्रमक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारने सत्तेवर येताच हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर केला आणि दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज काढलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे घोषित केले. त्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या या कर्जमाफीवर टीका करताना ही कर्जमाफी फसवी असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर आता शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील या कर्जमाफीबाबत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तसेच सरकारने दिलेल्या कर्जमाफीवर समाधानी नसल्याचे सांगत, अधिकाऱ्यांकडून पुरवली गेलेली माहिती चुकीचे असल्याचे देखील राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे आश्वसन दिले होते मात्र हे आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही अशी टीका शेट्टी यांनी यावेळी केली आहे. तसेच ३० सप्टेंबर २०१९ अखेर जे कर्जबाजारी असतील त्यांनाच कर्जमुक्तीसाठी पात्र ठरवले जाणार आहे वास्तविक पाहता दुष्काळ, अतिवृष्टी , महापूर यामुळे शेतकऱ्याचे जास्त नुकसान झालेले आहे. खरं तर या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती मात्र मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले त्याला मदत दिली जातीय परंतु खरं तर या वर्षीच्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे असे स्पष्ट मत यावेळी राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तुटपुंजी असल्याची टीका वारंवार विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/