प्रतिष्ठित डॉक्टरला त्यांच्याच दवाखान्यातील ‘फिजिओथेरपिस्ट’ने मागितली पन्नास लाखांची खंडणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगदीश चहाळ यांना त्यांच्या दवाखान्यात पूर्वी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करणाऱ्याने तब्बल पन्नास लाख रुपये खंडणी मागून ती उकळण्याचा प्रयत्न केला. यात गावठी कट्ट्याचाही वापर करण्यात आला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

डॉ. चहाळ यांना शनिवारी एका व्यक्तीचा फोन आला व त्यांनी फोनवरून धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी मागितल्यानंतर डॉक्टर चहाळ यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने या घटनेबाबत गोपनीयता बाळगून आरोपींचा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथके आरोपींचा शोध घेत होती. पन्नास लाख रुपये घेऊन डॉक्टर चहाळ यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले जात होते. पोलीसही साध्या वेशात त्यांच्या मागेपुढे फिरत होते. परंतु डॉक्टर चहाळ यांच्या घरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे खंडणीखोरांना संशय आला. त्यांनी सावधानता बाळगण्यास सुरुवात केली. अखेर काल सकाळी पुन्हा फोन करून सुपा येथे बोलावण्यात आले.

डॉक्टर चहाळ यांना सुपे-शहाजापूर रस्त्यावरील निर्जन स्थळी बोलावण्यात आले. त्या निर्जनस्थळीवर एका ठिकाणी पैशाची बॅग ठेवण्यास सांगितले. डॉ. चहाळ यांनी बनावट नोटा असलेली पैशांची बॅग सांगितलेल्या ठिकाणी ठेवली. त्यानंतर डॉ. तेथून निघून गेले. पोलीस त्या बॅगेवर लक्ष ठेवून होते. काही वेळानंतर एक जण तेथे येताच पोलिसांनी त्याला पकडले. ‘पोलिसी खाक्या’ दाखवताच त्याने आणखी दोघांची माहिती दिली. त्यांना सुपा येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पूर्वी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करणारे कुऱ्हाडे यांनीच हा खंडणीचा कट रचून ती उकळण्याचा प्रयत्न केला. शहरातील नामांकित डॉक्टरला खंडणी मागण्याच्या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीही नोबेल हॉस्पिटलच्या संचालकास खंडणी मागून ती उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

आरोग्यविषयक वृत्त –