राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रोहित पवार यांची मुलाखत ; मात्र, आमदार संग्राम जगताप, आ. वैभव पिचडांची दांडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती पक्ष निरीक्षक दिलीप वळसे पाटील व अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. कर्जत-जामखेड मतदार संघासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुलाखत दिली, तर आ. संग्राम जगताप व आ. वैभव पिचड यांनी दांडी मारली. या दोन विद्यमान आमदारांची दांडी राष्ट्रवादी भवनात चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे.

आ. संग्राम यांच्याऐवजी त्यांचे वडील विधानपरिषदेचे आ. अरुण जगताप हे आले होते. विधानसभेची रणधुमाळी आता सुरू झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी चालू केली आहे. आज नगरमधील राष्ट्रवादी भवन येथे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. १२ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी दाखल झाले होते. यामध्ये प्रामुख्याने कर्जत-जामखेड येथील जागेसाठी रोहित पवार यांनी मुलाखत दिली. पारनेरमध्ये निलेश लंके, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड, लामखडे यांनी मुलाखती दिल्या आहेत. तर निलेश लंके आणि प्रशांत गायकवाड यांनी एकमेकांना समर्थन देत इतर उमेदवारांवर गुगली टाकली आहे.

अकोलेचे आ. वैभव पिचड यांची गैरहजेरी प्रामुख्याने जाणवत होती. शहरात आ. संग्राम जगताप यांच्यावतीने प्रकाश जगताप यांनी हजेरी लावली होती. माजी महापौर अभिषेक कळमकर हेही इच्छुक आहेत.