राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. सकाळी ११ वाजता अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या प्रमाणात अहिर यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वरळी विधानसभेत शिवसेनेची ताकद वाढली आहे.

यावेळी बोलताना सचिन अहिर म्हणाले कि, ‘हा निर्णय घेताना मला त्रास झाला. पण राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. त्याचबरोबर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कार्यशैलीचे देखील कौतुक केले. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाबरोबर काम करण्याची संधी मिळणार असल्याने आपण आनंदित असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केला असला तरी राष्ट्रवादी फोडण्याचे काम करणार नसल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्याचवेळी अहिर यांच्या या पक्षप्रवेशावर अजित पवार सोडून राष्ट्रवादीच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची प्रतिक्रिया आलेली नाही.