सैनिक बँकेतून निराधार योजनेतल्या अनुदानाची रक्कम ‘हडप’ : गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत शासनाच्या वृद्ध, अपंग, निराधार योजनेतील अनुदान शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांदे व क्लार्क दीपक अनारसे यांनी संगनमताने हडप केले आहे. त्यामुळे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे पत्र सभासद विनायक गोस्वामी यांनी तहसीलदार कर्जत यांना दिले होते. बँक स्तरावर आरोपात तथ्य निघाल्याने कर्जत पोलीस स्टेशनमध्ये शाखा आधिकारी यांनी फिर्याद दिल्याने कर्जत पोलिसांनी दीपक अनारसे याच्यावर अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, मागील महिन्यात सैनिक बँकेचे सभासद विनायक गोस्वामी यांनी जिल्हा आधिकारी यांना बँकेतील अपहार बाबत पत्र दिले होते. त्यात म्हटले होते की, बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे, संचालक श्रीकांत तोरडमल यांच्या संगनमताने शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांदे, लिपिक दीपक अनारसे, यांनी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेतील मयत लाभार्थी यांच्या नावावर आलेली रक्कम शाखाअधिकारी सदाशिव फरांदे व दीपक आनरसे यांचे नातेवाईक असणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा करून ती रक्कम हडप केली आहे.

गोस्वामी यांच्या अर्जामुळे जिल्हा आधिकारी यांनी कर्जत तहसीलदार यांना तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्याचा तपास तहसीलदार यांच्याकडून चालू असतानाच शाखा आधिकारी सदाशिव फरांदे यांनी दीपक अनारसे याच्या विरुध्द फिर्याद दिली आहे.

‘खरे दोषी आरोपी मोकाट’

शाखाआधिकारी सदाशिव फरांदे, लिपिक दीपक अनारसे, रमेश मासाळ, संजय कोरडे यांनी संगनमताने हा अपहार केला आहे. सदर प्रकरणाची तहसीलदार यांच्याकडून तपासणी चालू असताना तहसीलदार यांच्याकडून जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची आवश्यकता असताना फरांदे यांनी यातून सुटण्यासाठी दीपक अनारसे याला बळीचा बकरा केले आहे. त्यामुळे अद्यापही या प्रकरणातील खरे आरोपी मोकाट आहेत. या प्रकरणातील शाखा आधिकारी व अन्य दोषीवर शासकीय गुन्हा दाखल केला पाहिजे अन्यथा मी जिल्हा आधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे.
– विनायक गोस्वामी (तक्रारदार)

आरोग्यविषयक वृत्त –