‘लाॅकडाऊन’मुळे सलून व्यावसायिक संकटात, आर्थिक मदतीची आवश्यकता

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लाॅकडाऊन केल्यानंतर अनेक छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे सुध्दा अवघड झाले आहे गेली जवळजवळ अडीच महिने सर्व आर्थिक आवक ठप्प झाल्याने घरातील जीवनावश्यक गोष्टी कशा पुर्ण करायच्या हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

लाॅकडाऊन केल्यानंतर केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने चालू राहिली परंतु सलून व छोटे हाॅटेल रेस्टॉरंट चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.बहुतेक सलून व्यावसायिक केवळ याच व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवत आहेत इतर कोणताही दुसरा जोडधंदा नाही सध्या अडीच महिन्यापासून घरातील लहान मुलांचा खर्च तसेच दैनंदिन खर्च यासाठी पैसा कुठून उपलब्ध करावा याची विवंचना लागली आहे.

यावर हवेली तालुका नाभीक संघटनेचे अध्यक्ष निलेश कोकरे म्हणाले की, या कोरोना महामारीच्या काळात नाभीक समाज मोठ्या अडचणीत सापडला आहे अशावेळी स्थानिक प्रशासन तसेच आमदार यांनी सामाजिक बांधिलकी जपत काही आर्थिक मदत करावी.हा एक पारंपारिक व्यवसाय आहे समाजाच्या जडणघडणीत बारा बलुतेदारांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

त्याचप्रमाणे हाॅटेल व्यवसायावर अनेक कुटूंबे आपला उदरनिर्वाह चालवतात सध्या सर्वच हाॅटेल्स बंद आहेत अशावेळी त्यांनाही आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.