एक हजाराची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, ‘तोडपाणी’ करणारे ACB च्या ‘रडार’वर

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यप्रशान करून वाहन चालविल्याच्या खटल्यात मदत करण्यासाठी एक हजारांची लाच घेतल्याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. जालिंदर पांडुरंग माने (वय ४० रा. शाहूनगर, इस्लामपूर) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस ठाण्यात ही कारवाई केली.

तक्रारदार हे मद्यप्रशान करून वाहन चालविताना सापडले. त्यांच्यावर खटला दाखल झाला. त्यात मदत करण्यासाठी माने याने दोन हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार सोमवारी तक्रार अर्ज दिला होता. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर चर्चेअंती एक हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी एक हजार रूपये घेताना माने याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उपाधीक्षक राजेंद्र साळुंखे, निरीक्षक गुरूदत्त मोरे, जितेंद्र काळे, संजय कलकुटगी, अविनाथ सागर, भास्कर भोरे, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ यांचा कारवाईत सहभाग होता. चौकट तोडपाणी फेम रडारवर
दरम्यान सांगली आणि मिरज शहरात तसेच गुन्हे अन्वेषण पथकात काम करणारे अनेकजण तोडपाणी करतात. त्यांच्या विरोधातही तक्रारी करण्यात आल्या आहेत. साहेबाला हाताशी धरून तोडपाणी करणारे लवकरच या सापळ्यात अडकणार असल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त