सांगलीत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवरून दोन गटात राडा, चाकू हल्ल्यात तिघे गंभीर जखमी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरज तालुक्यातील बोलवाड ग्रामपंचायतीची बुधवारी ग्रामसभा सुरू असताना तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीवरून सरपंच गट व विरोधी गटांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी दोन्ही गटांनी केलेल्या चाकूहल्ल्यात तिघेजण गम्भीर जखमी झाले. सतीश आनंदा दबडे (वय 82), सतिश गोपाळ सर्वदे (वय 28), शरद कल्लाप्पा नाईक (वय 28) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर मिरजेतील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मिरज ग्रामीण पोलिसात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार दाखल करून घेण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.

बोलवाड येथे तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसाठी सरपंच सुहास पाटील यांनी ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसभेच्या सुरूवातीस ग्रामसभेच्या अध्यक्षपदासाठी सतीश दबडे यांची निवड करा अशी मागणी सचिन कांबळे यांनी केली. दबडे यांना विरोध झाला. विरोध होताच ग्रामसभेच्या सुरूवातीस मोठा गोंधळ सुरू झाला. ग्रामसभेच्या अधिनियमाप्रमाणे निवड करा अशी मागणी सचिन कांबळे यांनी केली. त्याचवेळी सतीश सर्वदे, सतीश दबडे, शरद नाईक यांनी ही सभा चुकीच्या पध्दतीने निर्णय घेत असल्याचे सांगितले. त्याचवेळी माजी सरपंच पिंटू नाईक यांनीही दबडे यांना विरोध केला. त्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार वादावादी सुरू झाली.वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले. जोरदार हाणामारी सुरू असताना सतीश सर्वदे, सतीश दबडे, शरद नाईक यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. त्यामुळे आणखीन वातावरण चिघळले.

सतीश सर्वदे, सतीश दबडे, शरद नाईक यांना लगेच उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. सतीश सर्वदे यांना पिंटू नाईक यांनी चाकूने भोसकल्याचा आरोप सर्वदे यांनी केला आहे.
यावेळी ग्रामपंचायतीवर विरोधी गटाकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. बोलवाडमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले आहे. घटनेनंतर लगेच पोलिसांचा मोठा फौजफाटा बोलवाड गावात आला. पोलिस बंदोबस्तात वाढ केली असून पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले आहे.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले, उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांनी बोलवाड गावात येवून परिस्थितीची पाहणी केली.

आरोग्यविषयक वृत्त