Exit Poll 2019 सांगलीत भाजप की स्वाभिमानी विजयापासून ‘वंचित’ राहणार ! ‘वंचित’ची ‘सरशी’ की ‘झटका’ देणार

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांचे निकाल येत्या २३ तारखेला जाहीर होणार आहेत. अनेक माध्यमांनी एक्झिट पोलवरून निकालाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जनतेचा कौल भाजपाकडे असल्याचे दिसून येत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यंदाच्या निवडणुकीत मात्र २०१४ प्रमाणे पुन्हा जनता भाजपाला कौल देईल की स्वभिमानी बाजी मारेल ? हे येत्या २३ तारखेला कळेल मात्र सांगली मतदार संघात या दोघांच्यात ‘काटे की टक्कर’ असणार असे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.

सांगली मतदार संघ म्हणजे काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला मनाला जात होता मात्र २०१४ साली भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी रेकॉर्ड ब्रेक करीत सांगलीत भाजपचा झेंडा फडकावला. २०१४ च्या मोदी लाटेत सांगलीचा गड काँग्रेसच्या हातून निसटला. २०१९ ची लोकसभा निवडणूक पाहता पश्चिम महाराष्ट्रात महत्वाच्या समाजलया जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०१४ च्या निवडणुकीनंतर मात्र भाजपशी सोडचिठ्ठी घेतली. यंदाच्या निवडणुकीत स्वतः चा स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा या मतदारसंघावर ताबा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मदत घेतली आहे.

वंचित बहुजन आघाडीची मतं निर्णायक

सांगलीमध्ये बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर रिंगणात आहेत. सांगलीच्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची मतं निर्णायक ठरणार आहेत,असे बोलले जातं. सांगलीच्या तिरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांची मते महत्वाची आहेत. सांगलीमधला खरा मुकाबला काँग्रेस आणि भाजपमध्येच आहे. तरीही वंचित आघाडीची निर्णायक मते कुणाला फायदा करून देतात यावरच भाजप आणि काँग्रेसचं इथलं यश अवलंबून आहे.

मागच्या निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील यांना ६ लाख ११ हजार ५६३ मतं मिळाली तर काँग्रेसचे प्रतीक पाटील यांना ३ लाख ७२ हजार २७१ मतं मिळाली. त्यामुळे संजयकाका पाटील यांचा दणदणीत विजय झाला.सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, सांगली, जत, खानापूर, पलूस कडेगाव, तासगाव कवठे महांकाळ या विधानसभा मतदारसंघ येतात.