‘आंदोलनाचा हा काळा दिवस, देव आंदोलकांना सद्बुद्धी देवो’ : खा. संजय काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुडचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीत भाऊबीज निमित्त मतदार संघातील महिला माता-भगिनींना साडी भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्यांनी याप्रकरणी अतिशय हीन पातळीवर जाऊन राजकारण केले व आंदोलन केले. हिंदू संस्कृतीत भाऊबीज निमित्त भाऊ बहिणीला साडी भेट देतो आणि चंद्रकांत पाटील यांनी भाऊ समजूनच कोथरुड मतदार संघातील माता-भगिनींना साडी भेट दिली. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने याविषयी केलेल्या या आंदोलनाची नोंद काळा दिवस म्हणून होईल. ईश्वर या आंदोलकांना सद्बुद्धी देवो, अशा खोचक शब्दांत भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादी च्या आंदोलकांचा खरपूस समाचार घेतला.

कोथरुड विधानसभा मतदार संघात आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाऊबीज निमित्त साडी भेट दिल्यावरुन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा जाहीर निषेध करतानाच भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आपली भूमिका मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आंदोलन रस्ते, पाणी अशा विकासाच्या मुद्यांवर असते तर, आपण एकवेळ समजू शकलो असतो मात्र, हे आंदोलन करून त्यांनी भावा-बहिणीच्या नात्याविरोधातच त्यांचे संस्कार असल्याचे दाखवून दिले आहे. वास्तविक चंद्रकांत दादा पाटील हे निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवाळी सणात त्यांच्या मतदार संघातील माता-भगिनींबद्दल आपुलकीचे नाते ठेवून भाऊबीज साजरी करतात. याचे स्वागत करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस च्या पुण्यातील नेत्यांना त्याचे घाणेरडे राजकारण करावेसे वाटते. त्यांनी आंदोलन का केले हेच समजत नाही. देशात किंवा जगात अशाप्रकारे आंदोलन झाले नसेल. यातून त्यांची परिपक्वता लक्षात येते. देव त्यांना ही परिपक्वता लवकर देवो, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

चंद्रकांत दादा पाटील हे बारामती लोकसभा मतदार संघ, पश्चिम महाराष्ट्र आणि एकूणच राजकारणात खूप सक्रिय होते व आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून चंद्रकांत दादा पाटील यांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन लक्ष करण्यात येत आहे. याचा मी जाहीर निषेध करतो, असेही खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.