छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ समजले जाणारे खासदार संजय राऊत हे आज विरोधकांवर बरसल्याचे चित्र पहायला मिळाले. खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन नाव घेता संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी महापुरुषांचे फोटो वापरले जात असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

निवडणुकीच्या प्रचारासाठी सुभेदार तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्याऐवजी राजकीय नेत्यांचे चेहरे वापरले जात असल्यामुळे संजय राऊत यांनी नाव न घेता संभाजी भिडे यांना टोला लगावला आहे. राऊत यावेळी म्हणाले, चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात ज्यांनी सातारा बंद केला होता आणि अनेक मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या होत्या त्यांच्या रिऍक्शनची वाट मी सध्या पाहत आहे. शिवाजी महाराज युगपुरुष आहेत आणि त्यांचा अपमान सहन करणार नसल्याचे देखील राऊत यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

याबाबतचे सर्व पुरावे सातारा सांगलीत जे बंद करत होते त्यांना पाठवून दिले आहेत ते यावर काय प्रतिक्रिया देतात ते पाहायचे आहे त्यामुळे तुम्ही त्याना प्रश्न विचार असा आग्रह देखील यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांसमोर केला.

तसेच अशा कारणांमुळे सरकारला काहीही होत नाही कारण तीन वेगळ्या विचारांच्या पक्षांचे सरकार असले तरी हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर चालणारे आहे. असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर टीका केल्यामुळे चर्चेत आले होते आज पुन्हा राऊत यांनी नाव न घेता त्यांच्याबाबत भाष्य केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –