शिवसेनेला राष्ट्रवादी-काँग्रेसची साथ मिळणार ? ‘सामना’तून संजय राऊतांनी सांगितला ‘महाराष्ट्र फॅक्टर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात अजूनही राजकीय गोंधळ कायम आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीतील फूट स्पष्ट दिसत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची खुर्ची कोणाच्या कोर्टात जाईल हेही अद्याप  स्पष्ट झालेले नाही. राज्यपाल बी.एस. कोशियरी यांनी  शनिवारी सायंकाळी भाजपला सरकार स्थापनेचे आमंत्रण देत ते इच्छुक व सक्षम आहेत काय असा सवाल केला. यावरून  शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला आहे.

सामनाच्या ‘रोखठोक’  या लेखात संजय राऊत यांनी भाजपची तुलना हिटलरशी केली आहे. ते म्हणाले की, इतरांच्या भीतीपोटी पाच वर्षे राज्य करणारा हा गट आज स्वतःच घाबरलेला आहे. हा उलट हल्ला झाला. भीती दाखवूनही मार्ग सापडत नाही व पाठिंबा मिळत नाही असे जेव्हा घडते तेव्हा एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, हिटलर मेला आहे व गुलामीचे सावट दूर झाले आहे. पोलीस व इतर तपास यंत्रणांनी यापुढे तरी निर्भयपणे काम करावे! या निकालाचा हाच अर्थ आहे !

महाराष्ट्र हा दिल्लीचा गुलाम नाही –

महाराष्ट्राचे राजकारण महाराष्ट्रातच झाले पाहिजे, असे संजय राऊत यांनी लिहिले आहे. महाराष्ट्र हा दिल्लीचा गुलाम नाही. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा आशीर्वाद दिला, पण  15 दिवसानंतरही फडणवीस शपथ घेऊ शकले नाहीत कारण अमित शहा राज्यातील घडामोडींपासून अलिप्त राहिले आहेत. ‘युती’तला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना मावळत्या मुख्यमंत्र्यांशी बोलायला तयार नाही हा सगळ्यात मोठा पराभव. त्यामुळे दिल्लीचे आशीर्वाद लाभूनही घोड्यावर बसता आले नाही.

महाराष्ट्राची हवा खराब होऊ नये –

राऊत यांनी  रोखठोखमध्ये लिहिले की, ‘दिल्लीतील हवा बिघडली आहे. दिल्लीत पोलिस रस्त्यावर आले आणि त्यांनी कायदा मोडला. ही अनागोंदीची ठिणगी आहे. महाराष्ट्रात राजकीय अनागोंदी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना हा धडा आहे. आपण महाराष्ट्रातच महाराष्ट्राचा निर्णय घेण्यास निघालो आहोत.

Visit : Policenama.com