सांगलीत शाहरूख नदाफ टोळीवर मोका अंतर्गत कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार शाहरूख नदाफसह टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर जबरी चोरी, घरफोडी, चोरी, मारहाणीसह 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांसह सहा जनांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पाठवलेल्या या प्रस्तावाला गुरुवारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

शाहरूख रूस्तम नदाफ (वय 19, त्रिमुर्ती कॉलनी), सोहेल उर्फ टोल्या गफूर तांबोळी (वय 20), संतोष उर्फ ऋतिक शंकर चक्रनारायण (वय 20, दोघेही सध्या हनुमाननगर मूळ सोलापूर), अजय उर्फ वासुदेव भोपाल सोनवले (वय 20, रा. विठ्ठलनगर, शंभरफुटी रोडजवळ) यांच्यासह दोन अल्पवयीनांचाही कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे.

शाहरूख नदाफने टोळी तयार केली होती. या टोळीने सांगली ग्रामीण, सांगली शहर, संजयनगर, विश्रामबाग, मिरजेतील महात्मा गांधी चौकी व मिरज शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे केले आहेत. घरफोडी, चोरी, घरात घुसून दहशत माजवित मारहाण, दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न यासह 24 गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. टोळीची दहशत माजविण्यासाठी 9 जुलै रोजी या टोळीने दादासाहेब शिवाजी काळे व अवधूत केदार ट्रकच्या केबीनमध्ये झोपले असताना त्यांना कोयत्याचा धाक दाखवून 1500 रूपये काढून घेतले होते. त्याचवेळी शेजारी उभा असलेला सिमेंटने भरलेल्या ट्रकची काच फोडून ट्रकचा चालक फत्तेअहमद लालामत सौदावर यांना मारहाण करत 4 हजार काढून घेतले होते. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिसांत झाली.

दरम्यान, टोळीच्या वाढती दहशत मोडीत काढण्यासाठी मोकातंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी प्रस्ताव सादर केला. त्यास तातडीने मंजूरी देण्यात आली. पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर तपास करत आहेत. कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, संतोष माने, सचिन मोरे, विशाल भिसे यांचा सहभाग होता.

visit : policenama.com