भाजपात जाणार नसल्याचा गडाखांचा निर्वाळा

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाईन – मी कोणत्या पक्षातून उमेदवारी करणार, याची चिंता आमदार मुरकुटेंना सतावत आहे. मात्र आपण कधीही भाजपात जाणार नाही किंवा त्यांच्याकडून उमेदवारीही करणार नाही. त्यांनाच ती लखलाभ होवो आणि त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवावीच, असे जाहीर आव्हान माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिले आहे.

तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गडाख बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जबाजी फाटके होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पंडीत, तुकाराम शेंडे, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, बाजार समितीचे सभापती कडूबाळ कर्डीले, लक्ष्मण फाटके, संजय आहेर, एकनाथ रौदळ, विश्वासराव गडाख, सूर्यभान आघाव, कारभारी जावळे, अनिल अडसुरे, बाबुराव चौधरी, अजित रासने, बाळासाहेब नवले, भाऊसाहेब जाधव, पंढरीनाथ गायकवाड, सरपंच मिनलताई मोटे, लताबाई नवगिरे, पौलस गाढवे, वसंतराव काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खरवंडी, माळीचिंचोरा, बऱ्हाणपूर, रास्तापूर, परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना गडाख यांनी आमदार मुरकुटे यांच्या कार्यशैलीवर घणाघाती हल्ला चढवत एकप्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणशिंगच फुंकले.

यावेळी बोलताना गडाख म्हणाले की, विकासकामे एकीकडे तर राजकारण करणारे दुसरीकडे अशी तालुक्याची अवस्था झाली आहे. नाटकीपणा करण्याचे तंत्र आपल्याला जमले नसल्याची कबुली यावेळी त्यांनी दिली. मागच्या निवडणुकीतील पराभवाचे मी आत्मपरीक्षण केले ते तुम्ही केले आहे काय? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थितांना केला. धरणावर जाऊन बटन दाबताना फोटो काढणे, कामांची आकडेवारी फुगवून फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून जाहिरातबाजीचा भुलभुलैय्या उभा करण्याचा उद्योग सध्या तालुक्यात सुरू असल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधून आपण असे प्रकार न करता लोकोपयोगी कामे करण्यावर भर दिल्याचे ठामपणे सांगितले. तालुक्यात जेव्हडीही रस्त्यांची कामे केल्याचा डंका त्यांच्याकडून पिटला जात आहे, त्यांच्या नशिबाने अद्याप तालुक्यात पाऊस चांगला झालेला नसल्याने या रस्त्यांचे पितळ अद्याप उघडे पडले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

कायद्यात बसत नसतानाही सर्वसामान्य शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत केल्यावरून लोकप्रतिनिधी सहकार खात्याच्या माध्यमातून अडचणीत आणू पाहत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गडाख कुटुंबाच्या नावाने अहोरात्र शिव्याशाप देणारे आमदार मुरकुटे दुष्काळी अनुदान, पीक विमा, कृषी खात्यातील घोटाळ्यांवर बोलण्याचे टाळत असल्याचा चिमटा त्यांनी काढला. देशात ईडी, सीबीआय, सारख्या संस्थांचा गैरवापर केला जात असल्याची उदाहरणे असली तरी तालुक्यात आमच्या विरोधात एलसीबीचा गैरवापर करून राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याला त्यांनी यावेळी उजाळा दिला. संघर्षाशिवाय काही मिळत नसल्याचे स्पष्ट असल्याने कितीही संघर्ष करावा लागला तरी तो करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. राज्यात सर्वत्र भाजप-सेनेत प्रवेश करण्याची चढाओढ लागलेली असताना नेवासा तालुक्यात मात्र प्रामुख्याने युवकांचा ओढा क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडे लागल्याचे चित्र आगामी राजकीय भूमिका दर्शवत असल्यानेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सारकल्याचा दावा त्यांनी केला.

आरोग्यविषयक वृत्त –