एकदिवसीय शंकरगीता पारायणाची सेवा उत्साहात सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – श्री. सद्गुरु शंकरबाबांचा जणू प्रत्येक घरी आगळा – वेगळा असा उत्सवच प्रत्येक भक्तांच्या घरी पहावयास मिळत आहे. हा उपक्रम आणि ही आगळी – वेगळी सेवा पुण्यातील स्वामीभक्त श्री. दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शंकरबाबा मठातील माजी विश्वस्त कन्हैया ऊर्फ कमलेश दुबे यांनी बाबांच्या सेवेकरी परिवारास घेऊन सुरू केली आहे.

या पारायणास शोभा गायकवाड, कल्पना भुजबळ, प्रतिक्षा गायकवाड, सविता भोरडे, श्वेता कुलकर्णी, पल्लवी गायकवाड, अलका सुपेकर, सूरज सतीश गायकवाड हे पारायणास बसले होते आणि समितीच्या सेवेकरी उषा वाणी, नीता पासलकर, रेखा देवकर, वर्षा धुमाळ, हेमलता कोटकर, अश्विनी कदम, प्रतिभा शिरोडे, भारती शिरोडे, ज्योती आंबेकर यांनी देखील पारायणास आपली उपस्थिती लावली.

दादा ठोंबरे यांनी सांगितले की, शंकरबाबांच्या नावाने भक्तांच्या घरी आधी कलश स्थापन केला जातो आणि घरातील कुलदेवी, कुलदैवत तसेच आई – वडिल, गुरूवर्य, घरातील मोठ्यांचे नमन आणि आशीर्वाद घेऊन श्री. गणरायांचे आणि श्री. स्वामी समर्थांचे नामस्मरण करून या पारायणास सुरवात होते. प्रत्येक ठिकाणी हे एक दिवसीय शंकरगीतेचे पारायण साधारण तीन ते साडेतीन तासात संपन्न होते. त्यानंतर सर्व सेवेकरीपरिवार शंकरगीता सारामृत तालासुरात म्हणून बाबांना अतिथींच्या हातून पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवतात आणि श्रींची आरती करतात. ज्या भक्त परिवाराच्या घरी ही सेवा होत असते त्या घरातील अतिथीदेखील पारायणास बसतात.

सतीश गायकवाड यांनी सांगितले की, असा सोहळा आणि असे अध्यात्मिक बाबांचे कलश माझ्या हस्ते स्थापन करून केलेले पारायण हे खूप भक्तिमय प्रकारे समितीचे सेवेकरी करत आहेत. आणि त्यांच्या घरातील संपूर्ण परीवारात देखील हा आनंद उत्साहाने पहावयास मिळत होता. सर्व कुटुंबाने मिळून घरातील सजावट, बाबांचा महाप्रसाद केला आणि प्रत्येक सेवेकरींची हळदी-कुंकू लावून प्रत्येकाची साडी-चोळी श्रीफळाने ओटी भरुन मानपान दिला त्यांचे मनापासून आभार मानतो.

कन्हैया दुबे यांनी सांगितले की, भक्त परिवारात कसलेही आणि कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता ही सेवा पुण्यासोबतच हळूहळू संपूर्ण महाराष्टात शंकरबाबांच्या सेवेकऱ्यांच्या सहकार्याने घडणार आहे. या पारायण सेवेमुळे नक्कीच एक वेगळ्या आनंदाची अनुभूती आम्हा सर्व सेवेकरी परिवारास मिळत आहे.

फेसबुक या माध्यमातून ‘शंकरगीता पारायण समिती’ या अकाउंट ला ऍड होऊन शंकर बाबांचे भक्त इथे पारायण सेवेत आपली नाव नोंदणी करू शकतात असे पारायण समिती कडून सांगण्यात आले आहे