ईव्हीएम मशीनबाबतचा शरद पवारांचा दावाच ‘शंकास्पद’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरात व हैदराबाद येथील काही ईव्हीएम मशिन्सची तपासणी केली असता घड्याळाचे बटन दाबले तर कमळाला मत गेल्याचे मी स्वत: डोळ्यांनी पाहिलंय, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मात्र, त्याबाबत त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलेले नाही. मुळात देशातील निवडणुक, मतदान आणि ईव्हीएम मशीन हे पाहता शरद पवार यांचा दावाच चुकीचा आणि शंकास्पद वाटतो. केवळ पक्षाची पडती बाजू सावरण्यासाठी त्यांनी सर्व खापर ईव्हीएम मशीनवर फोडण्याचा हा प्रकार असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील मतदान पार पडल्यानंतर शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनबाबत दोनदा चिंता व्यक्त केली आहे. या अगोदर यांनी बारामतीत वेगळे काही घडले तर लोकशाही विषयीच शंका उपस्थित केली होती. त्यावेळी ते म्हटले होते की, भाजपचे नेते ज्या जोरावर बारामतीत विजयाचा दावा करताहेत, त्यामुळे यंदा जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडेल असे मत १ मे रोजी पवार यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे आपल्या बालेकिल्ल्यातच पवार यांना पराभवाची चिंता वाटत असल्याने ते अगोदरच त्याचे कारण ईव्हीएम मशीनवर ढकलत असल्याची टिका झाली होती. त्यानंतर आता त्यांनी सातारा येथे बोलताना अतिशय धक्कादायक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, की माझ्यासमोर गुजरात व हैदराबादमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटण दाबायला सांगितले. मी घड्याळाचे बटण दाबले तर कमळाला मत गेल्याचे मी स्वत: डोळ्याने पाहिले आहे.

सातारा येथील पत्रकार परिषदेत स्वत: शरद पवार यांनी हा दावा केला. मात्र, ही मशीन्स कोणी आणली, त्यांनी ती कधी पाहिली. हैदराबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नसताना त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ कसे येईल. तसेच ते गुजरातमधील मशीनबद्दल बोलत आहे. गुजरातमधील काही लोक म्हणजे ती कोण होती. त्यांनी ही मशीन कोठून मिळविली, अशा एकाही प्रश्नांचे उत्तर दिलेले नाही. शरद पवार यांचे हे विधानच अनेक त्रुटी आणि चुकीच्या माहितीवर आधारीत आहेत.

मुळात एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात मिळते, त्याप्रमाणे ही ईव्हीएम मशीन बाजारात मिळत नाही. भारत सरकारच्या दोन सरकारी कंपन्यांकडून निवडणुक आयोगासाठी ईव्हीएम मशीनची निर्मिती केली जाते. कोणी मागितले म्हणून या कंपन्या त्यांना ईव्हीएम मशीन देत नाही किंवा ती बाजारात विकली जात नाही. त्यामुळे निवडणुक आयोगाशिवाय दुसऱ्याकडे अशी मशीन्स मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांना कोणी निवडणुक आयोगाचे ईव्हीएम मशीन या लोकांकडे कसे आले, हा पहिला प्रश्न शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने ज्यांना ही सर्व प्रक्रिया माहिती आहे. त्यांनी विचारायला हवा होता.

हैदराबाद आणि गुजरातमधील हे काही लोक कोण आहे. त्यांच्याकडे जर अशी ईव्हीएम मशीन असतील तर पवार यांनी त्याची माहिती तातडीने प्रशासनाला, निवडणुक आयोगाला दिली पाहिजे होती. शरद पवार यांनी दक्षिण मुंबई मतदार संघातील ताडदेव येथे मतदान केले. त्या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. त्यामुळे खुद्ध शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळासमोर बटण दाबता आलेले नाही.

शरद पवार यांनी जे सांगितले अथवा स्वत: मशीनचे बटण दाबून पाहिले. ते कधी, कोठे हे सांगितलेले नाही़ जर असे मत कमळाला जात असेल तर त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी निवडणुक आयोगाकडे तक्रार का नोंदविली नाही. केवळ मतदान झाल्यानंतर अशा दोन चार ओळी सांगून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न गेली ५० वर्षे राजकारणात असलेल्या पवार यांनी करावा, हे आश्चर्यकारक आहे.

यापूर्वी निवडणुक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना ईव्हीएम मशीन हॅक करुन दाखवा, असे आव्हान दिले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे आव्हान आम्ही स्वीकारल्याचा राणा भीमदेवी थाटात जाहीर केले होते. प्रत्यक्षात जेव्हा ते हॅक करण्याचा दिवस आला. तेव्हा तांत्रिक कारणे सांगून माघार घेतली होती. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने केवळ राजकीय फायद्यासाठी एकूणच मतदान प्रक्रियेबाबत संशय निर्माण करणारे वक्तव्य करणे चुकीचे आहे.