Post_Banner_Top

मोदींच ‘केदारनाथ मंदिरा’त जाणं आणि ‘एक्झिट पोल’ हे दोन्ही नौटंकी : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातले सत्ताधारी निवडणूक संपल्यावर हिमालयात जाऊन बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केदारनाथ मंदिरात जाणं आणि एक्झिट पोल हे दोन्ही नौटंकी आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. देशात आज एक वेगळीच परिस्थिती आहे. देश कोणत्या वाटेवर जाईल, सत्ता कोणत्या विचारांच्या पक्षाची येईल हे स्पष्ट व्हायला अवघे दोन दिवस राहिले आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार मुंबईमधील रोजा इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. एवढंच नाही तर शरद पवार यांनी यावेळी प्रसारमाध्यमांवरही टीका केली.

देशात प्रसारमाध्यमांनी एक वेगळं वातावरण निर्माण केलं आहे. काही प्रसारमाध्यमं सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. मला रविवारपासून काही फोन येत असून चिंता व्यक्त केली जात आहे, मात्र मी सगळ्यांना सांगतो आहे की घाबरू नका, दोन दिवसातच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

सत्ताधार्यांनी राजधानी दिल्ली सोडून हिमालयात जाणं पसंत केलं आहे असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आम्ही इथे बंधुभाव जपण्याचा संदेश देत आहोत तर काही पक्षातले लोक वेगळाच विचार करताना दिसत आहेत. समाजातली बंधुभाव, एकता कशी टीकून राहिल? देशात परिवर्तन घडेल यावर माझा विश्वास आहे त्यासाठी मी अल्लाहकडे दुवा मागणार आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले आहेत. आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे २३ मे या निकालाच्या दिवसाची. देशात पुन्हा कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.

Loading...
You might also like