आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांची ‘ही’ रणनीती

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रणनीती आखणे सुरु केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सरसंगट कर्जमाफी करण्यात यावी, त्यासोबतच दुष्काळ निवारण करण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी. या मागण्यासांठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. बेरोजगारी, आरक्षण यासह अन्य प्रश्नांवर विधानसभेसाठी सरकारविरुद्ध आवाज उठविण्याचा राष्ट्रवादीचा इरादा आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. तरी देखील शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच कर्जमाफी करावी, यासाठी आग्रह धरणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारकडे मुबलक धान्याचे साठे उपलब्ध आहेत, दुष्काळग्रस्त भागातील जनतेला सरकारने अन्नधान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी पवार करणार आहेत.

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने २०१७ मध्ये दीड लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. यात ८९ लाख शेतकरी कुटुंबांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची योजना होती. परंतु प्रत्यक्षात ३८ लाख शेतकऱ्यांनाच या योजनेचा फायदा झाला असून, त्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. राज्यातील सुमारे ४३ टक्के शेतकऱ्यांना दीड लाखांच्या सरसकट कर्जमाफी योजनेचा फायदा झाला आहे, उर्वरित शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला घेरण्याचा विरोधकांचा डाव आहे असे बोलले जात आहे.