पक्षादेश डावलणारे ‘बाहुबली’ पवारांना आपलेसे का वाटले ?

वर्षापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी पकडलेले आज राष्ट्रवादीचे उमेदवार

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – चौकशीसाठी ताब्यात घेतले म्हणून समर्थकांनी थेट एसपी ऑफीसवरच हल्ला करून आपल्या खांद्यावर बसून नेत्याला उचलून घेऊन जायचे, हे कुठल्यातरी ‘बाहुबली’ नेत्याचे वर्णन वाटेल. राष्ट्रवादीचे नगर मतदारसंघातील उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्याबाबत एक वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती.

दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात त्यांना चौकशीसाठी एसपी कार्यालयात आणले असता त्यांच्या समर्थकांनी एसपी ऑफिसची तोडफोड करून दरवाजाच्या काचा फोडून संशयिताला खांद्यावर बसवून एखाद्या ‘बाहुबली’ नेत्यासारखे घोषणाबाजी करीत पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याच आ. संग्राम जगताप यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदेश डावलून राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना भाजपाला मतदान करण्याचे आदेश दिले. आता त्याच जगताप यांना काही महिन्यांच्या आतच उमेदवारी देण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आली. पवारांना अचानकपणे असा बाहुबली लोकसभेचा उमेदवार म्हणून का हवा वाटला, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर आ. संग्राम जगताप यांची जामिनावर सुटका झाली. मात्र, त्यांना अजूनही गुन्ह्यातून पूर्णपणे वगळलेले नाही. या गुन्ह्याच्या भीतीपोटीच आ. जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला मतदान करण्याचे आदेश दिले होते. ही बाब खुद्द शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगून जगताप यांच्यावरची नाराजी बोलून दाखवली होती. या निर्णयामुळे पक्षाच्या सर्व नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता पवार यांना दोन महिन्याच्या आतच पुन्हा त्याच आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्याची नामुष्की ओढवली. ही परिस्थिती पाहता पवार यांना बाहुबली नेता आपलेसा का वाटतो, असा प्रश्न पडतो.

आ. संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. विखे यांना टक्कर देण्यासाठी तेच चांगला सामना करू शकतात. पक्षातील इतर इच्छुकांच्या तुलनेत त्यांची उमेदवारी परवडणारी असेल. इतर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव पाहता पवार यांनी आ. संग्राम हे बाहुबली वाटत असूनही त्यांनाच उमेदवारी देण्याची वेळ आली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like