शिरूर : ‘त्या’ हॉस्पीटलमधील 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, शहरासह तालुक्याला दिलासा

शिरूर, पोलीसनामा ऑनलाइन – कारेगाव (ता.शिरूर) येथील ज्येष्ठ महिलेचा अहवाल कोरोना बाधित आल्याने बाबुरावनगरमधील उपचार घेतलेल्या हाॅस्पिटलमधील १८ जणांचे स्वॅब काल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यातील १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र शिंदे यांनी सांगितली.हाॅस्पिटलमधील चाैदा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने शिरूर शहरासह तालुक्याला दिलासा मिळाला आहे. अजुन हाॅस्पिटलच्या चार व कुटुंबातील १४ जणांचे अहवालाची प्रतिक्षा आहे.

कारेगाव येथील ज्येष्ठ महिलेला छातीत दुखत असल्याने दि.९ रोजी शिरूर शहराच्या बाह्यमहामार्गालगत असलेल्या बाबुराव नगरमधील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यानंतर दुस-या दिवशी दि.१० रोजी पुढील उपचारासाठी नगर व त्यानंतर दि.१३ रोजी पुणे येथील खाजगी दवाखान्यात सदर महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पुणे येथे उपचार सुरू असताना तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना बाधित आला होता.दि.९ रोजी येथील बाबुराव नगरला सदर महिला उपचार घेत असताना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसुन येत नव्हते.त्यानंतर पाच दिवसांनी पुणे येथे उपचार सुरू असताना महिलेचा तपासणी अहवाल कोरोना बाधित आला होता.

सदर महिलेला बाबुराव नगर येथील खाजगी दवाखान्यात एक दिवस उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याने या दवाखान्यातील १८ जणांची तपासणीसाठी स्वॅब पाठवण्यात आले होते.त्यातील १४ जणांचे अहवाल रविवार दि.१७ रोजी रात्री निगेटिव्ह आले असल्याने शिरूरसह तालुक्याला दिलासा मिळाला आहे.तर हाॅस्पिटलमधील अजुन चार जणांचे व महिलेच्या कुटुंबातील १४ जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र शिंदे व शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी सांगितली.

नागरीकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर न पडता विनाकारण बाहेर फिरायला जाऊन गर्दी करू नये तसेच भिती न बाळगता सर्दी,खोकला,ताप असल्यास आरोग्य विभागातुन उपचार करून घेऊन प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पलन करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र शिंदे व ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी केले आहे.