शिरूरमध्ये शिवसेनेचा ‘नेता’ सरस ठरणार की राष्ट्रवादीचा ‘अभिनेता’ ; जाणून घ्या काय असू शकतो निकाल ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या शिरूर लोकसभा मतदार संघात यावेळची लढत मोठी रंगतदार होणार आहे. सलग तीन वेळा खासदारकीच्या खुर्चीवर विराजमान झालेले शिवसेना नेते आढळराव पाटील आता चौथ्यांदा खासदारकीच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न उराशी घेऊन लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. तर शिवसेनेचा शिरूरमधला बुरुज ढासळवण्यासाठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेचा कौल नेत्याला राहणार की अभिनेत्याला हे येणारा काळच ठरवेल.

स्थानिकांमधला जनसंपर्क आढळरावांना तारणार ?

सलग तीन वेळा आढळराव पाटील यांनी खासदारकीची हॅट्रिक केली आहे. त्यांचा स्थानिकांमध्ये मोठा जनसंपर्क आहे. स्थानिकांमध्ये वावरणारा नेता म्हणून आढळराव पाटील यांची ओळख आहे. स्थानिक लोकांमध्ये आढळरावांचा मोठा दबदबा आहे. याचाच फायदा आढळराव पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो असे मत राजकीय तज्ञांकडुन वर्तवण्यात येत आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. मतदार अधिक सजग झाला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आढळरावांना सहजासहजी विजय मिळवणे इतके सोपे नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बैलगाडा शर्यत, विमानतळाचे जनतेला दाखवलेले गाजर, आणि दुष्काळ अशा मुद्द्यांवरून विरोधकांनी आढळराव पाटील यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे याचा फटका त्यांना यंदाच्या निवडणुकीत होऊ शकतो. असे सांगण्यात येत आहे.

अभिनेते अमोल कोल्हे राजकारणात बाजी मारणार का ?

‘छत्रपती संभाजी राजे’ या मालिकेतून घराघरात, सामान्य माणसांच्या मनात पोहचलेल्या अमोल कोल्हे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी राजकीय स्ट्रॅटेजी वापरत आढळराव पाटील यांना तगडे आव्हान दिले आहे. साहजिकच सेलिब्रेटी उमेदवारांना त्यांच्या सेलिब्रेटी असल्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले अमोल कोल्हे यांना २०१४ साली शिवसेनेचे उपनेते पद मिळाले. त्याचवर्षी लोकसभा निवडणुकीसाठी आढळराव पाटील यांच्या रॅलीमध्ये अमोल कोल्हे स्टार प्रचारक झाले होते हा इतिहास आहे. आता एका अभिनेत्याला सामान्य माणसाची कळ कळेल का ? जनतेचे प्रश्न कळतील का ? असा सवाल विरोधक तसेच सामान्यांतून विचारला जातो आहे. एकूणच या मतदार संघात अटीतटीचा सामना रंगणार हे निश्चित.

शिरूर लोकसभा मतदार संघ

एकूण मतदार – १६,९२,४७२

स्त्री मतदार – ८,१२,६४८

पुरुष मतदार – ८,७९,८२४