…अशीच तडजोड झाल्यास महापालिकेचे ‘तिकीट’ मिळणार ! शिवसैनिक ‘व्यथित’

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन  – शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती ही ‘महाराष्ट्रासाठी’ तडजोड केल्याचे विधान शिवसैनिकांच्या काळजात घुसले आहे. साहेब हीच तडजोड 2014 च्या विधानसभेच्या वेळी केली असती तर अनेक शिवसैनिक आज लढण्यासाठी उभे राहिले असते. मात्र, आपण केलेल्या उशिरामुळे आणि युतीच्या जागा वाटपाच्या नव्या सूत्रामुळे अनेकांना बालेकिल्यातही यापुढे तिकीट मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू झाली आहे

शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नुकतेच ‘समाना’ला मुलाखत दिली. यामध्ये भाजप सोबत युती ही महाराष्ट्राची गरज होती, असे त्यांनी म्हंटले आहे. त्यांच्या या विधानांवरून शिवसैनिकांमध्ये नाराजीची ‘भावना’ पसरली आहे.

याला कारणही तसेच आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सेना युती तुटली. तत्पूर्वी महाराष्ट्रात मोठ्या भावाची भुमिका पार पाडणाऱ्या शिवसेनेकडे विधानसभेच्या सर्वाधिक अर्थात सुमारे पावणेदोनशे जागा असत. या जागा देण्यास भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी नकार दिला. त्यावेळी ठाकरी बाणा दाखवत युतीस नकार दिला आणि युती तुटली. यामुळे नक्कीच शिवसेनेबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि शिवसेनेने विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले.

परंतु यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी मध्ये शिवसेनेला याची किंमत मोजावी लागली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपने जवळपास संपूर्ण राज्य कह्यात घेतले. मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद महापालिका ताब्यात ठेवताना शिवसेनेची दमछाक झाली. तर पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या पालिकांमध्ये तर शिवसेनेची अवस्था अगदीच केविलवाणी झाली. राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेला दुय्यम स्थान मिळाले. तरीही शिवसेनेने अनेक मुद्द्यांवर विरोधकांची पोकळी भरून काढण्याचे काम केले.

आता लोकसभेपूर्वी पुन्हा युती झाली आणि युतीला मागिळवेळी एवढेच यश मिळाले. मात्र विधानसभे साठी जागा वाटपाचा 144 – 144 चा फॉर्म्युला बासनात गेला. एवढेच नाही तर जागा वाटपाचे नवे सूत्र उदयाला आले. ज्या ठिकाणी ज्याचा आमदार ती जागा त्या पक्षाकडे राहणार. यामुळे तर पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरात शिवसेनेच्या हाती भोपळा आल्याने शिवसेनेत बंडखोरीचे वारे वाहू लागले. हेच सूत्र महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये राहण्याच्या भीतीने शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुण्यासारख्या 164 नगरसेवक संख्या असलेल्या किंवा पिंपरी चिंचवड सारख्या 128 संख्या बळ असलेल्या महापालिकांमध्ये भाजपचे पावणेदोनशे नगरसेवक आहेत. विशेष असे की भाजपची ही संख्या युतीच्या बालेकिल्ल्यात आहे. महापालिका निवडणुकीत जागा वाटपाचे युतीतील चित्र असेच ‘ तडजोडीचे ‘ राहिल्यास राजकीय विजनवास घ्यावा लागेल, अशी भुमिका शिवसैनिक व्यक्त करू लागले आहेत. ही बाब शिवसेनेसाठी धोक्याची घंटा असून असे झाल्यास विधानसभा निवडणुकीत शिवसैनिक वेगळी भूमिका बाजावतील, ज्याचा भाजपला फटका बसू शकतो असे आडाखे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस कडून मांडले जात आहेत.

Visit : Policenama.com