‘त्या’ प्रकरणी शिवसेना उपनेत्याच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी सुनावणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेतील शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह २० जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात फरार असलेले राठोड यांच्यासह इतरांच्या अटकपूर्व जामीनावर मंगळवारी (दि. 7 )जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

बोल्हेगाव उपनगरातील रस्त्याचे काम बंद पडल्याच्या निषेधार्थ शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगरसेवक अशोक बडे, आकाश कातोरे मदन आढाव, नगरसेविका कमल सप्रे, रिता भाकरे, दत्तात्रय सप्रे आदींनी नागरिकांसह आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या कार्यालयात ठिय्या दिला होता. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सोनटक्के यांना शिवीगाळ व दमदाटी करत बूट फेकून मारला होता. याप्रकरणी सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी राठोड यांच्यासह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

बूट फेकून मारणारा आरोपी मदन आढाव याला त्याच रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर नगरसेवक अशोक बडे यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली. इतर फरार आरोपींनी मात्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज सादर केला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. राठोड यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. त्यांना चांगली भाषा समजत नाही, त्यांना शिवसेना स्टाईल दाखवा, अशी चिथावणी राठोड यांनी दिली होती. त्यामुळे दलित कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.