भाजप आ. कर्डिले – शिवसेना वाद डाॅ. सुजय विखेंना भोवणार !

...तर वेगळा विचार करू : कर्डिले समर्थक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होणारी टीका कर्डिले समर्थकांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळेच पत्रकार परिषद घेऊन कर्डिले समर्थकांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. आ. कर्डिले व शिवसेनेतील वाद महायुतीचे उमेदवार विखे यांना चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील आ. शिवाजी कर्डिले यांच्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उपनेते माजी आ. अनिल राठोड यांनी महायुती उमेदवाराच्या प्रचार सभेत जोरदार टीका केली. प्रत्येक भाषणातून शिवसेनेच्या नेत्यांकडून कर्डिले यांच्यावर टीका केली जात आहे. ही टीका आ. कर्डिले व त्यांच्या समर्थकांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशात कर्डिलेंनीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. असे असतानाही वैयक्तिक द्वेषापोटी शिवसेनेकडून कर्डिलेंना टार्गेट केले जात आहे. शिवसेनेकडून वारंवार असा प्रकार केले जात असल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा सणसणीत इशारा आ. कर्डिले यांनी लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीत आ. शिवाजी कर्डिले यांनी नात्यागोत्यापेक्षा पक्ष महत्त्वाचा असल्याची भूमिका जाहीरपणे मांडली आहे. असे असतानाही त्यांच्या हेतूबद्दल संशय घेतला जात आहे, असे कर्डिले समर्थकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कर्डिले हे भाजपच्या असले, तरी त्यांचे जावई आ. संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असल्याने आ. शिवाजी कर्डिले महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करणार, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेकडून त्यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे कर्डिले समर्थक अस्वस्थ झाले आहेत.