विधानसभा 2019 : शिवाजीनगरमध्ये आमदारांवरील नाराजी, काँग्रेसचं मनोबल वाढलं, मत परिवर्तनाची आशा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवाजीनगर आणि कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्षांपुर्वी विभाजन होवून कोथरूड आणि शिवाजीनगर असे दोन विधानसभा मतदारसंघ झाले. २०१४ च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे या दोन्ही मतदारसंघात भाजपने घवघवीत यश मिळविले. विशेष असे की अडीच वर्षांपुर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही भाजपने विरोधकांचा धुराळा उडवत बहुमत मिळविले होते. परंतू आमदार विजय काळे यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षातूनच त्यांना विरोध होवू लागल्याने भाजपअंतर्गत कुरबुरी वाढल्याने विरोधकांचे विशेषत: कॉंग्रेसचे मनोबल वाढले आहे. मागील पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेल्याने यंदाच्या निवडणुकीत तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार असल्याचे सध्याच्या वातावरणावरुन दिसून येत आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विजय काळे यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार विनायक निम्हण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य अनिल भोसले यांचा पराभव केला होता. शिवसेनेचे उमेदवार मिलिंद एकबोटे यांनीही या निवडणुकीमध्ये दहा हजार मते घेतली होती. मात्र, या निवडणुकीनंतर विनायक निम्हण यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. तर पक्षनेतृत्वावर नाराज झालेले अनिल भोसले यांनी पक्षापासून अंतर राखत पत्नी रेश्मा भोसले यांना महापालिका निवडणुकीत भाजपच्या पाठींब्यावर निवडूण आणले. रेश्मा भोसले या भाजपच्या सहयोगी सदस्य म्हणूनच काम करत आहेत. परंतू अगदी गल्ली ते दिल्ली सत्तेत आल्यानंतरही पक्षाच्या मूळच्या कार्यकर्त्यांना काळे यांनी न्याय दिला नसल्याच्या भावनेतून कार्यकर्ते जाहीरपणे त्यांचा निषेध करू लागल्याने काळे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याबाबत खुद्द भाजपमधून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वेळच्या निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणुक वेगळी आहे. मागे भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र निवडणुक लढले होते. दोन्ही कॉंग्रेस उमेदवारांच्या मतांची बेरीज ही विजय काळे यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक होती. तर मनसेनेही उमेदवार उभा केला होता. परंतू यंदा भाजप शिवसेना युतीची शक्यता असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये लढणार आहे. त्यामुळे मागीलवेळी झालेली पंचरंगी लढत यंदा फारतर तिरंगी होण्याची शक्यता आहे. भाजपकडून यंदा उमेदवार बदलण्याचे संकेत मिळत असून तब्बल ४१ जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यातही नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, दत्ता खाडे, सुनिल माने यांच्यासह खासदार संजय काकडे ही या मतदारसंघातून इच्छुक आहेत.

शिवसेनेनेही युतीमध्ये या मतदारसंघाची मागणी केली असून माजी आमदार विनायक निम्हण हे मतदारसंघातून इच्छूक आहेत. आघाडीमध्ये हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे असून कॉंग्रेसकडून खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष, नगरसेवक आणि शहर कॉंग्रेसचे शहर सरचिटणीस मनीष आनंद यांनी काही महिन्यांपासून या मतदारसंघातून जोरदार तयारी सुरू केली आहे. युवा वर्गामध्ये त्यांचे चांगले प्राबल्य असून चांगली वातावरण निर्मिती केली आहे. माजी नगरसेवक दत्ता बहिरटही या मतदारसंघातून इच्छूक असून त्यांनी विविध प्रश्‍नांवर आवाज उठवत लक्ष वेधून घेतले आहे. मनसेने यंदा निवडणुक लढवायचे ठरविले असले तरी मतदारसंघातून चांगली लढत देवू शकेल अशा कार्यकर्त्याचा शोध सुरू आहे. प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये भाजपकडून कोण उमेदवार येणार, त्याला शिवसेनेची साथ महत्वाची राहाणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील विविध पदे भोगलेली काही मंडळी भाजपच्या वळचणीला गेल्याने दोन्ही कॉंग्रेसमधील नवीन पिढी पुढे येत आहे. त्यांना जनतेकडून सहानुभूतीही मिळत आहे. परंतू या सहानुभूतीचे परिवर्तन मतात किती होणार? यावर या मतदारसंघाची लढत ठरेल, असे तूर्तास तरी पाहायला मिळत आहे.

Visit : policenama.com