शिवसैनिकांवर खोटा गुन्हा दाखल केलाचा : शहरप्रमुख सातपुते यांचा आरोप

ठेकेदाराच्या घरासमोर आंदोलन करणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बोल्हेगाव कमान ते गणेशचौक रस्त्याचे काम बंद पडले आहे. म्हणून शिवसैनिक फक्त अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते. जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रस्त्याचे काम मार्गी लागेपर्यंत शिवसेना पाठपुरावा करणार आहे. तात्काळ काम सुरू न झाल्यास ठेकेदाराच्या घर किंवा कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिला आहे.

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत बोलताना शहरप्रमुख
दिलीप सातपुते म्हणाले की, बोल्हेगाव रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत सोडले आहे. रस्ता खोदून ठेवला आहे. खडी टाकली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ठेकेदार मनपा प्रशासन त्यांच्यावर कारवाई का करत नाही, याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी आयुक्‍तांच्या दालनात आंदोलन केले. शहर अभियंत्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पदाधिकारी आक्रमक झाले. दरम्यानच्या काळात शिवसेना उपनेते अनिल राठोड हेही तिथे आले होते. दालनात घडलेल्या प्रकाराबाबत सरकारी कामाचा अडथळा आणल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळात एखादे काम सुरू असतांना शासकीय कर्मचारी एखादे काम करत असताना त्याला अडवून काम बंद पाडले, तर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो. आंदोलनकर्ते काम सुरू करण्याची मागणी करीत होते. त्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो ? हा खोटा गुन्हा असून त्यात उपस्थित सर्वांनाच आरोपी करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तिथे उपस्थित होते. त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. जे काम करत नाहीत, ते काम करा म्हणून मागणी करणार्‍यांवर कामात अडथळे आणल्याचे खोटे गुन्हे दाखल करीत आहेत.

आ. जगताप यांनी काम बंद पाडले
सदर रस्त्याचे काम आ.संग्राम जगताप यांनी दबाव आणून बंद पाडलेले आहे. त्यांनीच गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव टाकला, असा आरोपही सातपुते यांनी केला आहे.