अभियंत्यांवर बूट फेकल्याचे प्रकरण : शिवसेनेच्या ‘त्या’ उपनेत्याला का होईना ‘अटक’ ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही शिवसेना उपनेते अनिल राठोड हे खुलेआमपणे नगर शहरात फिरत आहेत. सावेडी येथील कचरा डेपो जळितानंतर तेथे भेट देऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तरीही पोलीस प्रशासन त्यांना अटक करण्याची हिंमत दाखवत नाही. सामान्य माणसांसाठी किरकोळ गुन्ह्यातही अटक करणारे पोलीस प्रशासन शिवसेना उपनेत्याला अटक करण्याची हिंमत का दाखवत नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यावर महापालिकेच्या शहर अभियंत्यांवर बूट भिरकावल्या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका अधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी राठोड यांनी चिथावणी दिल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओही पोलिसांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत दाखल केला होता. आरोपी राठोड यांना अटक करणे किती आवश्यक आहे, असे पोलिसांच्यावतीने न्यायालयात पटवून देण्यात आले. न्यायालयानेही ते मान्य करून अनिल राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे राठोड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. जामीन फेटाळलेल्या माजी आमदार अनिल राठोड यास अटक करण्याची हिंमत पोलीस प्रशासन का दाखवत नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला अटक न करण्याची नेमकी कोणती मजबुरी आहे, असेही विचारले जाऊ लागले आहे.

सामान्य नागरिकांना कायद्याचा धाक दाखविणारे, किरकोळ गुन्ह्यातही तात्काळ अटक करणारे पोलिस राजकीय व्यक्तीस नेमके अभय का देत आहेत ? यामागचे नेमके कारण काय आहे ? कायद्याचे राज्य सर्वांसाठी समान असते. कायद्यासमोर सर्वजण समान असतात, मग अनिल राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळूनही अटक का होत नाही ?

विशेष म्हणजे त्याला अटक करणे किती आवश्यक आहे, असे पोलिसांनी सांगूनही तो नगर शहरात खुलेआम फिरत आहे. पोलिस त्याला का अटक करत नाही ? यावरून आता पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.