आधी विधान परिषद अन् आता ‘बाहेर’च्या मुळे शिवसैनिक ‘वंचित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवबंधन बांधत शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषदेचे पहिल्यांदाच सदस्य झालेले तानाजी सावंत यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागल्याने तळागाळात वर्षानुवर्षे शिवसेना वाढविली. तसेच अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या विशेषत: विधानसभा सदस्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना दिसून येत आहे. मात्र, ती व्यक्त करायला कोठेही जागा नसल्याने त्यांची घुसमट होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

यापूर्वी मंत्रीमंडळात विधान परिषदेवरील आमदारांना मंत्रीमंडळात जागा मिळाल्याने थेट लोकांमध्ये निवडून आलेले आमदार नाराज होते. आता पक्षांतर करुन येऊन थेट कॅबिनेट पटकविल्याने आता नेमके करायचे तरी काय अशी चर्चा वरिष्ठ आमदारांमध्ये सुरु झाली आहे. शिवसेनेच्या विशेषत: विधानसभा सदस्यांमध्ये नाराजीची भावना दिसून आली.

‘मातोश्री’च्या निकट असलेले विधान परिषद सदस्य अनिल परब, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पदरी निराशाच आली. काल आलेल्या क्षीरसागरांना मंत्री करताना राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर असे निष्ठावंत वंचित राहिले.

सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत अशा विधान परिषद सदस्यांना पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मातोश्रीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

यावेळी तानाजी सावंत विधान परिषदेचे सदस्य असतानाही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. जातीपातीचा विचार शिवसेनेत होत नाही असे नेहमीच कौतुकाने म्हटले जाते. जयदत्त क्षीरसागर हे तेली समाजाचे आहेत आणि राष्ट्रवादीत येताच त्यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्री केले. क्षीरसागर यांचे तेली समाजात वजन असले तरी हा समाज मोठ्या प्रमाणात आज भाजपसोबत आहे.

अशावेळी क्षीरसागर यांना संधी देताना कोणता निकष लावला असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ आमदाराने नाव न देण्याच्या अटीवर केला. क्षीरसागर आणि सावंत यांना मंत्रीपदे दिल्याने शिवसेनेच्या आघाडीवर मंत्रीपदापासून ‘वंचित’ असलेल्यांची संख्या मात्र वाढली आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा होती. पण तसे काहीही झाले नाही.

‘आपण शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केले होते का या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, शिवसेनेचे निर्णय हे त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेत असतात. त्यांनी मला दोघांचा कॅबिनेट मंत्री
म्हणून समावेश करण्यास सांगितले होते. तसे मी केले.